Panipuri seller monthly income viral reel insight on street food business profit : कॅसी परेरा (Cassy Pereira) या कंटेंट क्रिएटरच्या एका व्हायरल इन्स्टाग्राम रीलमुळे सध्या इंटरनेटवर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. एका पाणीपुरी विक्रेता महिन्याला सुमारे ९०००० रुपये कमवू शकतो असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या व्हिडिओची सुरुवातीलाच एक प्रश्न विचारण्यात आला आहे की, “एका बी.कॉम पदवीधरापेक्षा पाणीपुरीवाला जास्त कमावतो का? चला शोधूया.”
या सोशल मीडिया क्रिएटरने या व्हिडीओमध्ये हा व्यवसाय समजून घेण्यासाठी संपूर्ण दिवस त्या स्टॉलवर घालवला. याची सुरुवात त्याने कांदे कसे कापायचे, बटाटे कसे सोलले जातात आणि ‘आलू’ कसा तयार केला जातो, याचे निरीक्षण आणि ते शिकून घेण्यापासून केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, त्याने ही सर्व कामे स्वतः करून देखील पाहिली.
एका प्लेटमध्ये किती पुऱ्या येतात हे समजून घेतल्यानंतर त्याने लोकांना पाणीपुरी विकायला सुरूवात केली. तो या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाला की, “मी खरं सांगतो, मी सुरुवातीला काहीसा घाबरलेला होता, पण नंतर मला त्याची सवय होऊन गेली.” पुढे लोकांची गर्दी वाढू लागली आणि विक्री देखील वाढत गेली. याबद्दल सांगताना तो म्हणाला की, “अगदी एका तासात १२० पुऱ्या संपल्या.” त्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेतल्यानंतर लगेच त्याला पुन्हा कामाला लागावे लागले कारण लोकांची गर्दी पुढे वाढतच गेली असेही त्याने नमूद केले.
दिवसाला किती कमाई होते?
दिवसभराच्या निरीक्षणांच्या आधारे या क्रिएटरने अंदाजे पाणीपुरी विक्रीतून होणाऱ्या दिवसभराच्या कमाईचा आकडा सांगितला. हे दुकान संध्याकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालते, ज्यामध्ये एका प्लेटची किंमत ३० रुपयांपर्यंत इतकी आहे. त्या क्रिएटरच्या मते पाणीपुरी विक्रेता दिवसाला साधारणपणे ८० ते १०० प्लेट पाणीपुरी विकतो, ज्यामधून त्याची दिवसाला ३००० रुपये कमाई होते. हे गणित वापरून त्याने निष्कर्ष काढला की या दुकानातून महिन्याला ९० हजार आणि वर्षाला सुमारे १०.८ लाख रुपये कमावले जाऊ शकतात.
या दाव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाहायला मिळत आहे. अनेकांनी बिझनेससाठी वाव असल्याचे मान्य केले, तर अनेकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. या व्हिडीओच्या खाली अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या कमाईची दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराशी तुलना केली आहे. “हे माझ्या सीटीसीपेक्षा जास्त आहे” अशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. इतरांनी हा आकडा निव्वळ नफा आहे की फक्त एकूण विक्री, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युजरने लिहिले, “९०,००० रुपये हे महिन्याचे उत्पन्न आहे. मग खर्च किती आणि उरलेला नफा किती?” असा प्रश्न विचारला आहे.
