Goa Parasailing Accident Video : गोवा म्हटलं की, मजा, मस्ती आणि आनंद असंच जणू समीकरण आहे. त्यामुळे भारतासह परदेशी पाहुण्यांनाही गोवा नेहमी खुणावत असते. रोज हजारो पर्यटक गोव्यात फिरण्यासाठी येतात. इथले समुद्रकिनारे, नाईट लाईफ हे सर्व आकर्षणाचे केंद्र आहे. त्यात गोव्यात आल्यानंतर तिथल्या समुद्रात वॉटरस्पोर्टस आणि बंजी जंपिंग करण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. पण, याच वॉटरस्पोस्पोर्टसचा आनंद घेताना एका पर्यटकाबरोबर धक्कादायक घटना घडली, ज्याचा धडकी भरवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे.
ही दुर्घटना गोव्याच्या बागा बीचवर घडली, जिथे पॅरासेलिंग करताना हवेत असताना एका पर्यटकाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्यामागे अडकवलेली दोरी अचानक तुटली आणि तो थेट समुद्रात कोसळला.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, खोल समुद्रात काही पर्यटक वॉटरस्पोर्टसचा आनंद घेत आहेत. त्यादरम्यान एक पर्यटक पॅरासेलिंग करतोय, दूर हवेत जात असताना समुद्रात बोटीला जोडलेली त्याची पॅरासेलिंगची दोरी अचानक तुटली आणि तो पर्यटक हवेतून थेट खाली समुद्रात कोसळला, जवळपास १५ फूट उंचीवरून तो समुद्रात पडला. परंतु, पॅराशूटमुळे त्याचा वेग कमी झाला आणि त्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्याने घातलेल्या लाईफ जॅकेटने त्याचा जीव वाचवला.
यावेळी बोटीवर त्या पर्यटकाबरोबर असलेली एक महिला मोठ्याने ओरडू लागली आणि कर्मचाऱ्यांकडे मदतीसाठी याचना करू लागली. तिची भीती व्हिडीओमधून स्पष्टपणे जाणवत होती, ज्यामुळे त्या क्षणी परिस्थिती किती भयावह होती याची कल्पना येते. पण, दुर्घटनेनंतर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता, बोट तशीच फिरवली आणि पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर काढले. पण, या दुर्घटनेमुळे सर्वच जण खूप घाबरले होते.
बागा बीचवरील या दुर्घटनेचा व्हिडीओ @anilchandela83 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात लोकांनी गोव्यातील वॉटरस्पोर्टसच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अनेक युजर्सनी सांगितले की, यापूर्वीही असेच अपघात घडले आहेत; परंतु कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही. एका युजरने कमेंट केली की, दोरीचा दर्जा खूपच निकृष्ट दिसत होता आणि उपकरणांची योग्य प्रकारे देखभाल केली जात नव्हती. दुसऱ्याने म्हटले की, भीतीचे एक नवीन कारण. तर काही लोकांनी तर असेही म्हटले की, भारतातील पर्यटनस्थळांवरील सुरक्षेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही.
