Mother Son Emotional Bond Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही हसवतात, तर काही भावूक करतात. काही व्हिडीओ अनेकदा वादाचा विषयही बनतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका आईने तिच्या लहान मुलाला असा काही प्रश्न विचारला की, तो प्रश्न ऐकून खूप रडू लागला. नंतर त्याने त्यावर असे काही उत्तर दिले की, ते पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. अनेकांनी त्या आईवर संताप व्यक्त केला आहे.

लहान वयात मुलाचे आई हेच जग असते. आईशिवाय जगण्याची तो कल्पनाच करू शकत नाही. काही वेळ जरी आईपासून ते दूर झालं तरी ते रडू लागते, आठवणीने भावूक होते. व्हायरल व्हिडीओत आईने आपल्या मुलाला मी परत कधी नाही आली तर…, असा प्रश्न विचारला, जो पाहून चिमुकला आतून खूप घाबरला आणि रडू लागला.

व्हायरल व्हिडीओत एक आई आपल्या लहान मुलाला विचारते, “जर आई निघून गेली आणि परत कधी आली नाही, तर तू काय करशील?” त्यावर तो मुलगा सुरुवातीला निरागसपणे उत्तर देतो, “मी तुमच्या फोटोवर प्रेम करीन.” पण काही क्षणांतच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि तो भावूक होऊन रडू लागतो. जेव्हा आई त्याला विचारते की, तू का रडतोयस, तेव्हा तो मुलगा आणखीनच भावूक होतो आणि विचारतो, “तुम्ही मराल का? मी देवाकडे प्रार्थना करीन की माझी आई लवकर परत यावी.”

मुलाला रडताना पाहून, आई अखेरीस त्याला धीर देते की, ती कुठेही जाणार नाही आणि त्याला सोडून जाणार नाही. त्यानंतर तो मुलगा चेहऱ्यावर खोटे हसू आणतो आणि हातांनी हृदयाचा आकार बनवतो. व्हिडीओचा शेवट काहीसा दिलासादायक असला तरी, त्यापूर्वीच्या भावनिक क्षणामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत.

लोकांचा संताप

या व्हिडीओवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी याला चुकीचं पालकत्व म्हटले आणि लहान मुलांना असे प्रश्न विचारू नयेत, असे सांगितले. या वयात मुले खूप संवेदनशील असतात. अशा प्रश्नांमुळे त्यांच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. काहींनी असाही प्रश्न उपस्थित केला की, केवळ कंटेंट तयार करण्याच्या नावाखाली मुलांच्या भावनांशी खेळणं योग्य नाही.

या घटनेमुळे सोशल मीडियाच्या युगात पालकत्वाच्या मर्यादा काय असाव्यात, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मुलांवर सहज प्रभाव पडतो आणि त्यांना अनेकदा प्रत्येक गोष्टीचा अर्थ पूर्णपणे समजत नाही. यामुळे पालकांनी त्यांच्या भावनांचा आदर करणे अधिकच महत्त्वाचे ठरते.