Chanakya Niti Parenting Tips : पालक म्हणून आपण नेहमीच आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करत असतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? मुलांचे यश केवळ त्यांच्या शाळेच्या रिपोर्ट कार्डवर नाही, तर त्यांना बालपणात मिळालेले संस्कार आणि त्यांना लागलेल्या सवयी यांवर अवलंबून असते. लहान वयात लागलेल्या चांगल्या-वाईट सवयीच त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि करिअर ठरवतात.

आजच्या या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात मुलांना योग्य आणि अयोग्य यांतील फरक समजणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जर तुम्हालाही तुमचे मूल भविष्यात एक समजूतदार, जबाबदार आणि अत्यंत यशस्वी व्यक्ती व्हावी, असे वाटत असेल, तर त्यांना काही महत्त्वाचे जीवनपाठ शिकवणे गरजेचे आहे. याबाबत आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या ६ अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक मुलाने लवकरात लवकर शिकल्या पाहिजेत आणि पालकांनी त्या त्यांच्या अंगी बाणवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी…

१. मित्रांची निवड नेहमी विचारपूर्वक करा

मुलांसाठी हा सर्वांत महत्त्वाचा धडा आहे. आचार्य चाणक्य यांचा संगतीच्या परिणामावर खूप विश्वास होता. त्यांच्या मते, आपण ज्या लोकांबरोबर वेळ घालवतो, ते आपली विचारसरणी, सवयी आणि आपले भविष्य ठरवतात. लहान मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात मैत्रीची मोठी भूमिका असते. याचा अर्थ असा नाही की, मुलांनी इतरांमध्ये चुका शोधाव्यात; तर त्यांनी ही मैत्री आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी, प्रामाणिक राहण्यासाठी आणि चांगल्या कामासाठी प्रेरित करते की नाही, हे पाहायला शिकले पाहिजे.

२. प्रसिद्धीपेक्षा चारित्र्य अधिक महत्त्वाचे

चाणक्य यांचा एक अत्यंत मोलाचा संदेश म्हणजे माणसाची खरी किंमत त्याच्या चारित्र्यावरून ठरते. त्यांच्या मते, तुमची पत (Reputation) म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे होय; परंतु तुमचे चारित्र्य (Character) म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात काय आहात, जे कोणीही पाहत नसताना दिसून येते. मुलांवर अनेकदा इतरांना प्रभावित करण्याचा दबाव असतो; परंतु चांगले चारित्र्य तेव्हाच घडते जेव्हा एखादी व्यक्ती कठीण प्रसंगातही प्रामाणिक राहते, स्वतःच्या चुका मान्य करून त्यात सुधारणा करते आणि कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता, योग्य काम करते.

३. प्रत्येक गुपित शेअर करू नका

आचार्य चाणक्य यांनी ही गोष्ट खूप पूर्वी शिकवली असली तरी सोशल मीडियाच्या आजच्या काळात ती अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या वैयक्तिक गोष्टी सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. चाणक्य यांनी नेहमीच हुशारी आणि सावधगिरी बाळगण्यावर भर दिला. त्यांच्या मते, प्रत्येक गोष्ट प्रत्येकासमोर उघड करणे योग्य नाही. आपल्या वैयक्तिक भावना किंवा कुटुंबातील गोष्टी केवळ विश्वासू व्यक्तींनाच सांगाव्यात. अशी माहिती कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून देऊ नये.

४. बोलण्यापूर्वी विचार करा आणि संयम बाळगा

आचार्य चाणक्य यांनी शब्दांच्या ताकदीला खूप महत्त्व दिले आहे. मुलांचा स्वभाव अनेकदा भावनांच्या भरात लगेच बोलून जाण्याचा असतो; परंतु चाणक्य यांच्या मते, स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोलण्यापूर्वी थोडा वेळ थांबून विचार करायला हवा. आत्मविश्वासाने बोलण्याबरोबरच मुलांनी जबाबदारीने बोलायला शिकले पाहिजे. ‘हे बोलण्याची काही चांगली पद्धत आहे का?’ किंवा ‘हे बोलणे खरोखर गरजेचे आहे का?’, असे प्रश्न मुलांना बोलण्यापूर्वी विचार करण्यास मदत करतील. तुमच्या प्रत्येक शब्दाचा समोरच्यावर परिणाम होत असतो, हे मुलांनी लक्षात ठेवले पाहिजे.

५. कठोर परिश्रम आणि शिस्तीची भीती बाळगू नका

शॉर्टकट आणि झटपट यशाच्या आजच्या जगात, चाणक्य नीती सांगते की, यश नेहमी कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मिळते. जे मूल कष्टाचा आदर करायला शिकते, त्याला एक मोठे सत्य समजते की, तुमची प्रतिभा तुमच्यासाठी मार्ग खुली करू शकते; परंतु तुमची शिस्तच तुम्हाला त्या मार्गावर पुढे घेऊन जाऊ शकते.

६. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका

आचार्य चाणक्य यांची एक मुख्य शिकवण स्वतःवरील नियंत्रण (Self-control) आणि भावनांच्या शिस्तीबद्दल होती. त्यांच्या मते, जी व्यक्ती राग किंवा भावनांच्या भरात वाहून जाते, तिला योग्य निर्णय घेणे कठीण जाते. मुलांनी त्यांच्या भावना समजून घेणे, कठीण प्रसंगात शांत राहणे आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला शिकवून आणि कठीण प्रसंग शांततेने हाताळण्याचे मार्ग दाखवून ही सवय लावली पाहिजे.