Car Collides with Express Train: रेल्वे क्रॉसिंगवर अनेक अपघात घडत असतात. हे अपघात टाळण्यासाठी रेल्वेनं वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सोई-सुविधा केलेल्या असतात. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी गेटही बसवलेले असते. मात्र, तरीही काही लोक अनेकदा नियम न पाळता अयोग्य वेळी रेल्वे रूळ ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करतात. त्यामुळे भीषण अपघाताची नामुष्की ओढवत असते. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवासी आणि सामान्य नागरिकांना धोका टाळून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या जात असतात. पण, सामान्य नागरिक तरीही अनेकदा बेजबाबदारपणे स्वतःचा जीव जणू मुद्दाम धोक्यात घालत असतात. रेल्वे क्रॉसिंगसाठी गेट बंद असतानाही लोक खाली वाकून रूळ ओलांडतात, सायकल वा बाईकही वाकून घेऊन जातात. अशा चुकीच्या कृतींमुळे अनेकदा अनेकांचे जीव गेले आहेत. तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत. अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय. हा अपघात पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. पश्चिम बंगालमधील खर्डहा स्थानकाजवळ बंद होत असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ आपले वाहन उभे करणे एका कारस्वाराला महागात पडले. रुळांवरून जाणारी एक्स्प्रेस रुळाजवळ उभ्या असलेल्या कारला धडकली. या अपघातात ट्रेन गाडीला धडकून माचिससारखी ढकलताना दिसत आहे. (हे ही वाचा : “काळ आला होता पण…” जीवावरचं संकट टळलं; चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या व्यक्तीचा गेला तोल अन्…पाहा थरारक VIDEO) या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ 'X' या मायक्रोब्लॉगिंग साइटवर @sdeepayan या हॅण्डलसह शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे क्रॉसिंगच्या गेटजवळ कार उभी असलेली दिसत आहे. ही कार फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करीत होती. तिनं जवळपास रेल्वे रूळ ओलांडलेच होते. पण, तेवढ्यात पाठीमागून एक भरधाव ट्रेन आली अन् तिनं या एसयूव्ही कारला जोरदार धडक दिली. अंगावर काटा आणणारं हे दृश्य फारच भयानक आहे. मात्र, हे फुटेज पाहता मोठी दुर्घटना टळली, असे म्हणता येईल. कारण- ट्रेनचा वेग कमी होता आणि एसयूव्हीमध्ये कोणीही उपस्थित नव्हते. रेल्वेच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले, "रविवारी रात्री ८.४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. एसयूव्हीच्या ड्रायव्हरने लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करताना गेटमनच्या थांबण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर कारचा चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. परंतु, पूर्व रेल्वे प्रशासनाने त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि राज्य पोलिसांना त्याच्याविरुद्ध गुन्ह्याचा तपास करण्यास सांगितले आहे. येथे पाहा व्हिडीओ हा व्हिडीओ इंटनेटवर तुफान व्हायरल होत असून, खळबळ माजवतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट्सही येताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक अपघातांचे व्हिडीओ समोर येत असतात. अनेकदा लोकांच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात घडतात; तर कधी चूक नसतानाही काहींना अपघाताचा सामना करावा लागतो.