हल्ली कोण काय करेल याचा काही नेम नाही हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. असाच एक प्रकार इजिप्तमध्ये घडला आहे. या व्यक्तीचा कारनामा पाहून त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील बुचकळ्यात पडले. रुग्णाने केलेल्या कृत्यामुळे त्याचा जीवच धोक्यात असल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली आणि रुग्णाचा जीव वाचला. मात्र, या प्रकारामुळे डॉक्टरांना मोठा धक्का बसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं झालं काय?

हा प्रकार घडला अप्पर इजिप्तच्या असवान शहरामध्ये. असवान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण पोटदुखीची समस्या घेऊन आला होता. या रुग्णाचं नाव रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं नसलं, तरी त्यानं केलेला प्रताप समोर आला आहे. पोटात असह्य वेदना होत असल्याची तक्रार रुग्णानं केल्यानंतर त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. पोटदुखीचं नेमकं कारण समजू न शकल्यामुळे त्याचा एक्स-रे काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

डॉक्टरही पडले बुचकळ्यात!

रुग्णाचा एक्स-रे पाहून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी देखील बुचकळ्यात पडले. कारण त्याच्या एक्स-रेमध्ये चक्क एक आख्खा मोबाईल फोन त्याच्या पोटात असल्याचं दिसत होतं! डॉक्टरांनी वारंवार तपासून पाहिल्यानंतर अखेर तो मोबाईल फोनच असल्याचं स्पष्ट झालं. याविषयी संबंधित रुग्णाला विचारणा केली असता त्यानं खुलासा केला.

सहा महिन्यांपूर्वी गिळला मोबाईल फोन!

या रुग्णानं दिलेल्या माहितीनुसार, चक्क ६ महिन्यांपूर्वी त्यानं एक मोबाईल फोन गिळला होता. फोन चुकून गिळल्याचं त्यानं सांगितलं. पण या कृत्याबद्दल तो स्वत:च इतका खजील झाला होता, की डॉक्टरांकडे जाण्याची देखील त्याला लाज वाटू लागली. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने हा फोन शौचातून बाहेर पडेल, या आशेवर त्यानं चक्क सहा महिने कळ काढली. पण शेवटी पोटदुखी प्रचंड वाढल्यानंतर त्यानं अखेर रुग्णालय गाठलं. या मोबाईल फोनमुळे त्याच्या शरीरातून अन्नपदार्थ पुढे जाईनासेच झाल्यानंतर त्याने डॉक्टरांचा धावा केला.

तातडीने केली सर्जरी

रुग्णाची परिस्थिती आणि त्याच्या जिवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेता डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. असवान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. “एखाद्या रुग्णानं आख्खा मोबाईल फोनच गिळल्याचं पहिलंच प्रकरण आम्ही पाहात आहोत”, अशी प्रतिक्रिया असवान युनिव्हर्सिटी रुग्णालयाचे संचालक मोहमद अल देहशौरी यांनी दिली.