सध्या इंडिगो फ्लाइटचा उड्डाण करण्यापूर्वी केलेल्या अनाउंसमेंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आता तुम्हीही विचार करत असाल की, फ्लाईटमध्ये केलेल्या अनाउंसमेंटमध्ये इतकं काय विशेष आहे, जे सोशल मीडियावर होऊ लागलंय. खरं तर, देशात पहिल्यांदाच एखाद्या फ्लाइटमध्ये कॅप्टन भोजपुरी भाषेत घोषणा करताना या व्हिडीओमध्ये दिसून येतोय. हा व्हिडिओ इंडिगो फ्लाईटचा आहे, जी दिल्लीहून पाटण्याला जात होती. या व्हिडीओमध्ये इंडिगो फ्लाइटमधील अटेंडंट चक्क भोजपुरी भाषेत प्रवाशांचं स्वागत करताना दिसून येतोय. इंडिगो क्रू मेंबरने वैमानिकाची भोजपुरी भाषेतच प्रवासी व्यवस्थापकाशी ओळख करून दिली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडतोय.

क्रू मेंबर म्हणाला, ‘रौआ लोगानचे अभिनंदन’

विमानात बसल्यानंतर उड्डाण करण्यापुर्वी सुरूवातीला प्रवाश्यांचे स्वागत इंग्रजी भाषेतून केलं जातं, हे तुम्ही अनेकदा चित्रपटात पाहिलं असेल किंवा मग वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये पाहण्यात आलंच असेल. पण हेच स्वागत जर तुमच्या प्रादेशिक भाषेत झालं तर? होय, हे खरंय. दिल्लीहून पाटणाला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये अगदी त्यांच्याच प्रादेशिक भाषेत प्रवाशांचं स्वागत करण्यात आलंय. चक्क भोजपुरी भाषेतून विमानात झालेलं स्वागत पाहून सर्व प्रवाशांना सुखद धक्का मिळालाय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, विमानात एक घोषणा होतेय. “इंडिगो परिवार की तरफ से रऊआ सभी लोगन के हार्दिक अभिनंदन करत जानी बा और स्वागत करत जानी बा”, असं म्हणत चक्क भोजपुरी भाषेत विमानातील प्रवाशांचं स्वागत करण्यात आलंय. फक्त स्वागतचं नव्हे तर पुढच्या सर्व सूचना भोजपुरी भाषेतच देण्यात आल्या आहेत. त्यानंतर शेवटला भोजपुरी भाषा समजली आहे का? असं देखील विचारण्यात आलंय. हिंदीत सूचना देण्याची गरज आहे का? असं सुद्दा विचारताना दिसून येत आहेत. आपल्या भाषेत झालेलं स्वागत पाहून प्रवासी देखील आनंदी झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

छत्तीसगढचे आयएएस अधिकारी अवनीश शरन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. ‘आपली भाषा बोला, वाचा, लिहा आणि प्रोत्साहन द्या’ अशी कॅप्शन देत त्यांनी ही व्हिडीओ शेअर केलाय.

भोजपुरी ही भाषा मुख्यत्वे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशसह भारतातील काही राज्यांमध्ये बोलली जाते. इंडिगोने छठ उत्सव लक्षात घेऊन भोजपुरीमध्ये घोषणा करण्याचं ठरवलंय. लोकांना इंडिगो कंपनीचा हा नवा प्रयत्न खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आपल्या भाषेसाठी प्रोत्साहित करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक करत १७२५ जणांनी हा व्हिडीओ रीट्वीट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लोकांनी या व्हिडीओला भोजपुरी भाषेच्या सन्मानाच्या रूपात पाहताना दिसून येत आहेत. इंडिगोप्रमाणेच इतर कंपन्यांनी सुद्धा विमानात प्रादेशिक भाषेत घोषणा सुरू करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.