मोदी यांनी २०१४ मध्ये दिलेले १५ लाख रूपयांचे आश्वासन लोक अद्याप विसरले नाहीत. विरोधकांनी तर यावरून अनेकदा सरकारला धारेवर धरले आहे. अमित शाह यांनी हा निवडणुकीचा जुमला असल्याचे स्पष्ट केले असतानाही लोकांना अद्याप खात्यात सरकार पैसे जमा करणार असल्याचा विश्वास आहे. याची प्रचिती केरळमधील मुन्नरमध्ये आली. मोदीजी पोस्टल खात्यात १५ लाख रूपये जमा करणार असल्याचा मेसेज केरळच्या मुन्नार भागातील लोकांना आला. हा मेसेज आल्यानंतर केरळमधील लोकांनी पोस्टाबाहेर तोबा गर्दी केली. अनेकांनी कामावर सुट्टी घेऊन पोस्ट ऑफिस आणि बँकेत हजेरी लावली.

पोस्टल खाते असणाऱ्यांना मोदी सरकारकडून १५ लाख रूपये जमा करणार असल्याचा मेसेज मुन्नारमध्ये शनिवारी व्हायरल झाला. अनेकांना व्हॉट्स अ‍ॅपवर आलेला मेसेज आनेकांना खरा वाटला आणि दुसऱ्या दिवशी मुन्नारच्या पोस्ट ऑफिसबाहेर लोकांची गर्दी झाली. सुरूवातीला पोस्ट कर्मचाऱ्यांना काहीच लक्षात आले नाही. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच व्हॉट्स अ‍ॅपवर आलेला १५ लाख रूपयांचा मेसेज खोटा असल्याचे सांगण्यात आले. बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आवारात तसे फलकही लावण्यात आले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. मुन्नार पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या तीन दिवसांत १५०० नवीन खाती उघडण्यात आली.

यापूर्वी व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे देवीकुलम आरडीओ कार्यालयाबाहेरही लोकांनी अशीच गर्दी केली होती. केंद्र सरकार मोफत घर आणि जमीन देणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता.