हल्ली डेटिंग अ‍ॅप नावाचा प्रकार बराच चर्चेत आला आहे. विशेषत: तरुण-तरुणींमध्ये या प्रकाराविषयी बरंच आकर्षण आणि उत्सुकता दिसून येत आहे. अनेकदा डेटिंग अ‍ॅपमधील बनावट किंवा खोट्या प्रोफाईल्सला भुलून फसवले गेल्याच्या घटना देखील अनेकांसोबत घडल्याचं समोर आलं आहे. मात्र, एका पठ्ठ्यानं फसवले गेल्याची तक्रार करत डेटिंग अ‍ॅपच्या मालक कंपनीलाच कोर्टात खेचलं आहे. कंपनीनं दावा केल्याप्रमाणे तेवढ्या संख्येनं मुलींचे प्रोफाईल नसल्याची तक्रार या व्यक्तीनं केली असून त्यासाठी कंपनीकडून नुकसानभरपाईची देखील मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत रीतसर ठरवून केलेला विवाह किंवा प्रेमविवाह असे दोन प्रकार माहिती होते. आता मात्र, डेटिंग अ‍ॅप नावाच्या तिसऱ्या प्रकाराच्या माध्यातून देखील काही प्रमाणात विवाह होऊ लागल्याचं दिसून येत आहे. या डेटिंग अ‍ॅपवर आपापली माहिती भरली, की तुमच्यासाठी योग्य असा ‘मॅच’ शोधला जातो. त्यानंतर संबंधित तरुण-तरुणीने एकमेकांना डेट करून आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का, हे तपासून पाहायचं आणि निष्कर्ष सकारात्मक असल्यास लग्नाचा निर्णय घ्यायचा अशी ही साधारण प्रक्रिया असते. मात्र, अशा अ‍ॅपचा वापर करून फसवणुकीचे अनेक प्रकार घडल्याचं देखील समोर आलं आहे.

डेटिंग अ‍ॅपच्या नावाने फसवणुकीचे प्रकार

खोटे किंवा बनावट प्रोफाईल बनवून मुलगा किंवा मुलीच्या नावाने फसवणूक वा लुबाडणूक केल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. अनेकदा अशा ठिकाणी सेक्स रॅकेट सुरु असल्याच्या देखील काही घटना घडल्या आहेत. तर काही वेळा संबंधित डेटिंग अ‍ॅपनं वायदा केलेल्या सुविधा किंवा माहिती उपलब्धच नसल्याचं आपल्या लक्षात येतं. अमेरिकेतल्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर असलेल्या डेन्वरमध्ये असाच काहीसा प्रकार घडला असून त्यामुळे वैतागलेल्या तरुणानं चक्क संबंधित डेटिंग अ‍ॅपविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. टाईम्स नाऊनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

९,४०० अमेरिकी डॉलर भरून घेतली मेंबरशिप!

डेन्वरमध्ये राहणाऱ्या इयान क्रॉस नावाच्या एका २९ वर्षीय तरुणाने न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. इथल्या एका डेटिंग अ‍ॅपनं आपल्या जाहिरातीमध्ये “आमच्या अ‍ॅपवर २५ ते ३५ वयोगटातल्या असंख्य महिला आहेत”, असा दावा केल्याचं तरुणाचं म्हणणं आहे. त्यासाठी या तरुणानं तब्बल ९ हजार ४०० अमेरिकी डॉलर भरून संबंधित डेटिंग अ‍ॅपची मेंबरशिप देखील घेतली. पण प्रत्यक्षात त्याचा भ्रमनिरासच झाला!

त्या वयोगटातल्या फक्त ५ महिला!

दरम्यान, डेटिंग अ‍ॅपची मेंबरशिप घेतल्यानंतर या अ‍ॅपवर १८ ते ३५ या वयोगटातल्या फक्त पाचच महिला असल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणानं थेट न्यायालयात धाव घेतली आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात अशाच एका प्रकरणात एका महिलेने आपल्याला ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या पुरुषाचा ‘मॅच’ मिळवून दिल्याची तक्रार करत एका डेटिंग अ‍ॅपविरोधात याचिका दाखल केली होती. एलीन मूरे असं या महिलेचं नाव असून ती पेशानं डॉक्टर आहे. या महिलेने संबंधित डेटिंग अ‍ॅपकडून ४ हजार ९९५ अमेरिकी डॉलर्सची नुकसान भरपाई आणि रीतसर जाहीर माफीनामा मिळावा अशी मागणी केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person files complaint against dating app for less women than assured pmw
First published on: 24-10-2021 at 18:26 IST