आजच्या धावपळीच्या जगात माणसांमधील नात्यांची काळजी करणे अनेकदा हरवताना दिसते; पण कधी कधी काही साधे, मनापासून केलेले क्षण आपल्याला पुन्हा आठवण करून देतात की आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. सोशल मीडियावर सध्या असेच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ज्यामध्ये प्रेम, कृतज्ञता व माणुसकीची सुंदर झलक पाहायला मिळते. कोणतीही अपेक्षा, कोणताही राग न ठेवता केलेल्या छोट्या सरप्राईजमुळे एखाद्याचा दिवस कसा खास बनू शकतो, याची जाणीव हा व्हिडीओ करून देतो. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहताना अनेकांच्या चेहऱ्यावर आपसूक हसू येईल, तर काहींचे डोळेही पणावतील.

या व्हिडीओमध्ये पीजीमध्ये राहणाऱ्या काही मुलींनी त्यांच्या कुकसाठी खास बर्थडे सरप्राईज केलेले दिसते. नेहमीप्रमाणे कामासाठी आलेल्या त्या महिलेला सुरुवातीला काय चालले आहे हे समजत नाही; पण खोलीत प्रवेश करताच तिच्यासाठी केलेली सजावट, केक आणि मुलींचा उत्साह पाहून ती आश्चर्यचकित होते. मुलींनी तिला केक कापायला सांगितले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी गिफ्ट्सही दिले.

पाहा व्हिडीओ

केक कापताना आणि सर्वांना केक भरवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. या अनपेक्षित सरप्राईजमुळे ती भावूकही झालेली. तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. रोजच्या कामाचा एक सामान्य दिवस तिच्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनतो. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर होताच व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मुलींच्या या कृतीचे कौतुक केले आहे. प्रतिक्रियांमध्ये अनेक युजर्सनी हे खरे माणुसकीचे उदाहरण असल्याचे म्हटले. काहींनी लिहिले की, अशा क्षणांना पैशांनी मोजता येत नाही. कारण- यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो; तर काहींनी असेही म्हटले की, या प्रेमळ वागणुकीमुळे त्या कुक आणि मुलींमधील नाते आणखी घट्ट झाले असेल. अनेकांना हा व्हिडीओ पाहून आपल्या आयुष्यातील अशाच छोट्या, पण खास आठवणी आठवल्या. या साध्या, पण भावनिक प्रसंगाने लोकांना पुन्हा एकदा दयाळूपणा आणि माणुसकीचे महत्त्व जाणवून दिले आहे.