भारताचे पहिले सीडीएस (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांच्या दुःखद अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण देश हळहळला. त्यांना देशभरात ठिकठिकाणी आदरांजली वाहिली जात आहे. अशातच कानपूरमधील भाजपा आमदार विनोद कटियार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात ते शहिदांना श्रद्धांजली वाहताना हसत असल्याचं दिसत आहे. त्यावरून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. माजी प्रशासकीय अधिकारी (IAS) सूर्यप्रताप सिंह यांनीही हा फोटो शेअर करत टीकास्त्र डागलं.

आयएएस सूर्यप्रताप सिंह भाजपा आमदाराचा फोटो ट्वीट करत म्हणाले, “काल नशेत असलेल्या पत्रकाराची श्रद्धांजली सभा पाहिली. आज कानपूरचे भाजपा आमदार विनोद कटियार यांची हसत-हसत श्रद्धांजली पाहा.” जवळपास साडेतीन हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय.

“दुःख व्यक्त करत असताना कोणी हसू कसं शकतं?”

अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत भाजपा आमदारावर सडकून टीका केलीय. कोणी याला भाजपाचा नकली राष्ट्रवाद म्हटलं तर कोणी वाईट घटनेवर दुःख व्यक्त करत असताना कोणी हसू कसं शकतं असा सवाल केला. याशिवाय काही लोकांनी भाजपावर उत्तराखंडची निवडणूक असल्याने शहिदांचा मतांसाठी वापर करत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा : तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एका युजरने म्हटलं, “यांच्या चेहऱ्यावरील हसू यांना देशभक्त शहीद झाल्याचा त्रास झाला नसल्याचं दाखवत आहे. श्रद्धांजली देताना डोळे ओले होतात हे या महाशयांना माहिती नाही. मनातील वेदना चेहऱ्यावर येते. मात्र, हे तर हसत आहेत. त्यांना केवळ त्यांच्या प्रचाराचं आणि फोटो काढण्याचं पडलं आहे.

दुसरीकडे काही भाजपा समर्थकांनी काँग्रेस नेत्यांचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत तेही दुःखाच्या प्रसंगी हसत असल्याचा दावा केला.