पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यापासून बनावट नोटांसबंधी लोक फार जागरुक आहेत. खासकरुन ५०० आणि २००० च्या नोटांसंबंधी रोज नवीन बातम्या समोर येत असतात. याचदरम्यान आता ५०० च्या नोटेसंबंधी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ५०० च्या नोटेमधील फरक सांगण्यात आलं असून यातील एक नोट खरी आणि दुसरी बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे अनेक लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओत करण्यात आलेला दावा चुकीचा

या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे की, ५०० ची अशी कोणताही नोट घेऊ नका ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून महात्मा गांधींच्या फोटोजवळ आहे. महात्मा गांधींच्या फोटोजवळ हिरी पट्टी असणारी नोट खोटी असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.

लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडीओत दोन्ही नोटा दाखवण्यात आल्या आहेत. मात्र हा व्हिडीओ बनावट आहे. आरबीआयनुसार, ५०० च्या दोन्ही नोटा वैध आहेत. याचाच अर्थ हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ आहे ती नोट आणि गांधींच्या फोटोजवळ हिरवी पट्टी असणारी नोट अशा दोन्ही नोटा खऱ्या आहेत.

PIBFactCheck ने आरबीआयच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नोटा खऱ्या असून त्यांना मान्यता आहे. यामुळे लोकांनी या व्हिडीओला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर ५०० च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या.