अमुक एखादं शिक्षण घेऊन आपल्या गावात काम करु असं स्वप्न अनेक तरुण पाहतात. पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. हे स्वप्न पूर्ण करुन आपण गावाचा विकास करु असेही हे लोक म्हणतात आणि त्यात ते यशस्वीही होतात. कोणी डॉक्टर होऊन गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे स्वप्न पाहते तर कोणी शिक्षक होऊन गावातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचे काम करते. कोणी अधिकारी होऊन गावाची प्रशासन यंत्रणा सांभाळण्याचे स्वप्न पाहते. अशाचप्रकारे पायलट होण्याचे स्वप्न पाहिलेला एक तरुण हे स्वप्न सत्यात उतरवल्यावर गाववाल्यांना विसरलेला नाही, आपल्या स्वप्नासोबतच त्याने गाववाल्यांचेही स्वप्न पूर्ण केले आहे. या तरुणाचे नाव आहे विकास ज्ञानी. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सारंगपूर येथे राहणाऱ्या या तरुणाने गाववाल्यांना खुश केले आहे.

विकास पायलट होण्याची तयारी करत होता. त्यावेळीच त्याने आपण जेव्हा पायलट बनू तेव्हा आपण गावातील ज्येष्ठांना विमान प्रवासाचा आनंद देऊ असे वचन दिले. काही लोक यश मिळाल्यानंतर आपले वचन विसरतात. मात्र विकासने आपण दिलेले वचन पूर्ण केले आणि त्याने पायलट झाल्यावर खरंच एक दिवस गावातील ज्येष्ठांना विमानाने प्रवास घडवला. यासाठी त्याने गावातील ७० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या गावकऱ्यांची निवड केली. त्याने या सर्वांसोबत चंदीगडपासून अमृतसर असा प्रवास केला. यावेळी ही ज्येष्ठ मंडळी अमृतसर येथील सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर याठिकाणी फिरले. आम्ही कधी विमानाने प्रवास करु असे आम्हाला वाटले नव्हते एसे ही हवाईसफर पूर्ण केल्यानंतर या ज्येष्ठांनी सांगितले. यामध्ये ९० वर्षाच्या बिमला नावाच्या महिलेचाही समावेश होता. त्या म्हणाल्या, या आयुष्यात मी विमानाने प्रवास करेन असे मला कधीच वाटले नव्हते. मात्र विकास दिलेल्या वचनाला जागल्याने ते शक्य झाले. तर विकासने पुण्याचे काम केले असल्याचे त्याचे वडिल महेंद्र म्हणाले.