विमान कोसळणे हा अपघात सर्वांत जास्त हानिकारक अपघात असतो, अशा घटनांनंतर वाचलेले प्रवाशी नशिबानेच वाचले असे म्हटले जाते. यातून वाचलेल्या प्रवाशांची स्थिती ही त्याक्षणी अर्धमेल्यासारखी झालेली असते. मात्र, अमेरिकेत एका विमान दुर्घटनेत प्रवासी त्यांचे विमान पॅसिफिक महासागरात कोसळल्यानंतरही हसत-खिदळत होते, आपण या थरारक घटनेचे साक्षीदार आहोत हे दाखवण्यासाठी सेल्फीही घेत होते.

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक छोटे प्रवासी विमान आकाशात उडताना अचानक पॅसिफिक महासागरता कोसळल्याचे दिसत आहे. या विमानात जास्त प्रवासी नसल्याने आणि विमानही छोटेच असल्याने यातील पायलटसह सर्व प्रवासी बचावले. त्यानंतर हे वाचलेले प्रवासी पाण्यावर तरंगताना कोसळलेल्या विमानाच्या अवशेषांसोबत हसत खेळत सेल्फी घेताना दिसत आहेत. तर काहीजण लाईफ जॅकेटचा वापरुन पाण्यावर तरंगताना स्वतःचाच जीव वाचवतानाचे व्हिडिओ चित्रीकरणही करीत होते.

टाइम्सनाऊच्या वृत्तानुसार, एरिअल फोटोशूट करण्यासाठी या छोट्या विमानाने काही फोटोग्राफर्स आणि क्रूमेंबर्ससह उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर फोटोशूट सुरु असताना विमानाच्या इंजिनात बिघाड होऊन ते अचानक बंद पडले. इंजिन पुन्हा सुरु करण्याचा पायलटने प्रयत्न केला मात्र, ते सुरु होत नव्हते. त्यामुळे ते पाण्यात कोसळवण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना पाण्यात उड्या घेण्यास सांगितले. हे ठिकाण सॅन फ्रॅन्सिस्कोपासून ९ किमी अंतरावर होते.

विमान कोसळल्यानंतर पायलट डेव्हिड लेश आणि त्याच्या सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट्ससह विमानाच्या बाहेर उड्या घेतल्या आणि आपला जीव वाचवला. त्यानंतर जेव्हा विमानाचे अवशेष काही प्रमाणात पाण्यात बुडाले तेव्हा हे लोक फोटो काढण्यात, सेल्फी घेण्यात आणि त्याचे चित्रिकरण करण्यात व्यस्त होते. इनसाईड एडिशनने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. दरम्यान, पाण्यात कोसळलेल्या ठिकाणी अनेक जेलीफिश आणि व्हेल माशांचे अस्तित्व असल्याचे पायलट लेश यांनी सांगितले. दरम्यान, कोस्टगार्डच्या मदतीने या सर्वांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.