Paraglider Accident Video :पॅराग्लायडिंग, स्कायडायव्हिंग, माउंटन फ्लाइंग आणि इतर साहसी खेळ आज जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात उंच भरारी घेताना जाणवणारा रोमांच, आकाशातून दिसणारे भव्य पर्वतरांगांचे दृश्य आणि स्वातंत्र्याची अनुभूती यामुळे अनेक पर्यटक आणि साहसी खेळाडू या साहसी खेळांकडे आकर्षित होतात. मात्र, या खेळांमध्ये तितकाच धोका देखील असतो. हवामानातील अचानक बदल, उड्डाण मार्गावरील अडथळे किंवा मानवी चूक यामुळे गंभीर अपघात घडू शकतात. अशाच एका थरारक घटनेने युरोपातील आल्प्स पर्वतरांगांमध्ये सर्वांचे लक्ष वेधले आहे, जिथे पॅराग्लायडर आणि एका पर्यटन विमानाची धोकादायक टक्कर झाली. हा क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरलहोत आहे.

आल्प्समधील थरारक VIDEO जगभर व्हायरल

ऑस्ट्रियन आल्प्समधील उत्तर भागात, श्मिटेनहोहे (Schmittenhöhe) पर्वताजवळ एक अत्यंत धक्कादायक हवाई अपघात घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेत एका पर्यटन विमानाने पॅराग्लायडरच्या कॅनोपीला धडक दिल्याने ती महिला आकाशातच नियंत्रण गमावून खाली कोसळण्याच्या स्थितीत आली होती.

पॅराग्लायडरला विमानाची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय सब्रीना शनिवारी दुपारी झेल आम सी (Zell am See) परिसरात पॅराग्लायडिंग करत होती. शांत आणि निसर्गरम्य आकाशात तिचे उड्डाण सुरू असताना अचानक एक लहान पर्यटन विमान तिच्या दिशेने आले आणि काही सेकंदातच तिच्या पॅराग्लायडरच्या कॅनोपीला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे पॅराग्लायडरचा मुख्य पंख फाटला आणि संपूर्ण नियंत्रण सुटले.

मृत्यू समोर होता पण महिलेच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

प्रत्यक्षदर्शी आणि कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये दिसते की, अपघातानंतर सब्रीना हवेतच फिरत खाली कोसळू लागते. फाटलेले कापड तिच्या भोवती गुंडाळले जाते आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होते. अशा भीषण क्षणीही तिने संयम न गमावता आपत्कालीन पॅराशूट (reserve parachute) सक्रिय करण्याचा प्रयत्न केला.

जसजशी ती डोंगराच्या दिशेने वेगाने खाली येत होती, तसतसे परिस्थिती अधिक गंभीर होत गेली. मात्र काही क्षण आधीच तिने राखीव पॅराशूट यशस्वीरित्या उघडले आणि तिचा वेग कमी झाला. याच निर्णयामुळे तिचा जीव वाचल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Plane rips through woman's parachute over Alps. Video captures terrifying moment
पॅराग्लायडरला विमानाची धडक, हवेतून थेट कोसळू लागली महिला,VIDEO Viral (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम / sab_thi)

जीवघेण्या अपघातातून थरारक बचाव झाल्यानंतर पॅराग्लायडर सब्रीनाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “२३.०५.२०२६ मला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे लिहित तिने हा दिवस स्वतःसाठी दुसरा जन्मदिवस असल्याचे म्हटले. “जेव्हा एका Cessna 172 विमानामुळे पॅराग्लायडर तुम्हाला थेट आकाशातून खाली फेकतो…” असे म्हणत तिने त्या भीषण क्षणाची आठवण सांगितली. “मी अजूनही इथे बसून हे टाईप करत आहे यावर विश्वास बसत नाही. काही गंभीर दुखापत न होता मी वाचले, हेच माझ्यासाठी मोठं भाग्य,” असेही तिने पोस्टमध्ये नमूद केले. तिची ही पोस्ट आणि अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पॅराग्लायडरला विमानाची धडक; VIDEO पाहताना क्षणभर थांबेल हृदयाचा ठोका

अपघातानंतर स्थानिक पोलिस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टरच्या मदतीने सब्रीनाला सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे या भीषण घटनेत तिला केवळ किरकोळ जखमा आणि मुका मार बसला.

ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन विमानाचा २८ वर्षीय पायलट सुरक्षितपणे झेल आम सी विमानतळावर उतरला. प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले की, पॅराग्लायडर अचानक त्याच्या मार्गात आला आणि टाळणे शक्य नव्हते.

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी सब्रीनाच्या प्रसंगावधानाचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. एका क्षणात जीवघेणी वाटणारी ही परिस्थिती केवळ योग्य निर्णय आणि राखीव पॅराशूटच्या वापरामुळे चमत्कारिक बचावात बदलली.