Narendra Modi Jhalmuri Seller Income: झारग्राममधून समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ एखाद्या सामान्य व्यक्तीचा नसून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. निवडणूक प्रचारादरम्यान झारग्राममध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या झालमुरीच्या गाडीजवळ मोदी अचानक थांबले आणि त्यांनी तेथे झालमुरीचा (भेळ) आस्वाद घेतला. या अनपेक्षित क्षणामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली आणि हा प्रसंग पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली.

परंतु, या घटनेनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला- ज्या साध्या विक्रेत्याच्या गाडीवर पंतप्रधानांनी झालमुरी खाल्ली, तो विक्रेता रोज किती कमाई करतो? याच प्रश्नाचं उत्तर आता स्वतः त्या विक्रेत्यानं दिलं असून, त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, पंतप्रधान निघून गेल्यानंतर झालमुरी विक्रेता एका वृत्तसंस्थेशी संवाद साधतो. तो सांगतो की, मोदींनी त्याच्याशी अत्यंत साधेपणानं संवाद साधला. त्यांनी त्याचं शिक्षण, गाव, कुटुंब यांबद्दल विचारपूस केली. इतकंच नाही, तर त्याच्या रोजच्या उत्पन्नाबद्दलही उत्सुकतेनं विचारलं. एका देशाच्या पंतप्रधानांकडून असा साधा संवाद झाल्यानं विक्रेता स्वतःही भारावून गेला होता.

त्यानंतर त्यानं आपल्या कमाईबद्दल उघडपणे सांगितलं. तो म्हणाला की, तो दिवसाला साधारण १००० ते १२०० रुपये कमावतो. त्या हिशेबानं महिन्याला त्याची कमाई सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत पोहोचते. त्या उत्पन्नावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यानं हेही स्पष्ट केलं की, तो मूळचा बिहारचा असून, रोजगाराच्या शोधात तो पश्चिम बंगालमध्ये आला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं पसरला असून, लोकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या विक्रेत्याच्या नशिबाचं कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहिलं, “भाईचं तर एकदम प्रमोशनच झालं!” तर दुसऱ्यानं म्हटलं, “आता दुकान जोरात चालणार, बाहेर मोदींचा फोटो लावून टाका.” आणखी एका युजरनं प्रतिक्रिया देताना म्हटलं, “बसल्या जागी मोठा फायदा झाला.”

एक साधा विक्रेता आणि देशाचा पंतप्रधान यांच्यात घडलेला हा क्षण केवळ व्हायरल व्हिडीओपुरता मर्यादित न राहता, सामान्य माणसाच्या जीवनात अचानक येणाऱ्या बदलाचीही कहाणी सांगून जातो. त्या एका भेटीनं त्या विक्रेत्याचं नशीब कितपत बदलणार, हे येणारा काळच ठरवेल; पण सध्या मात्र त्याची चर्चा सर्वत्र रंगलेली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दुकानावर थांबले होते, ते दुकान मूळचे बिहारचे रहिवासी विक्रम साह यांचे आहे. ते गेल्या १२ वर्षांपासून झारग्राममध्ये झालमुरीचे दुकान चालवत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा ताफा अचानक थांबल्याने दुकानदार आणि पाहणाऱ्यांसाठी तो एक अविस्मरणीय क्षण ठरला.