PM Narendra Modi Dancing Video: सोशल मीडियावर मोदींच्या भाषणाच्या व्हिडीओच्या क्लिप्स व्हायरल होण्याचा ट्रेंड आता मागे पडून मोदींचे डान्स. मोदींची गाणी अशा अनेक पोस्ट शेअर होत असतात. साहजिकच या सगळ्या पोस्ट एआय निर्मित असल्या तरी काहीवेळा यातील ताळमेळ इतका परफेक्ट असतो की खरोखरच समोर दिसतेय ती व्यक्ती आपले पंतप्रधान आहेत का? हा आवाज मोदींचाच आहे का? असेही प्रश्न पडू शकतात. आता सुद्धा मोदींचा असाच एक रॉकस्टार सारखा डान्स व्हायरल होतोय. आश्चर्य म्हणजे आता शेअर होणारा व्हिडीओ हा स्वतः मोदींनी आपल्या अधिकृत X खात्यावर पोस्ट केला आहे. मला स्वतःला नाचताना पाहून इतकी मज्जा आली असं म्हणत मोदींनी शेअर केलेला व्हिडीओ काहीच मिनिटात तुफान व्हायरल झालाय. मोदींचा हा नृत्याविष्कार नक्की कुणी आपल्यासमोर आणलाय आणि त्यावर नेटकरी कशा प्रतिक्रिया देतायत याची धम्माल पाहूया..

पंतप्रधान मोदी यांनी X वर @krishna या अकाउंटवर शेअर केलेला आपल्या डान्स करतानाचा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. कृष्णाने हा व्हिडीओ फोटोशॉप वापरून एडिट केला आहे हे एकतर व्हिडीओकडे बघूनही स्पष्ट होतं पण त्याने त्याबाबत कॅप्शनमध्येही स्पष्टीकरण दिले आहे. कृष्णाने लिहिले की, “मी हा व्हिडीओ पोस्ट करतोय कारण मला माहित आहे की हुकूमशाह मला हा व्हिडीओ एडिट करण्यासाठी अटक करणार नाही”. आश्चर्य म्हणजे कृष्णाने मोदींना हुकूमशाह संबोधले असले तरी मोदींनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींनी लिहिले की, “लोकसभा निवडणुकीतील मतदान व प्रचारसभांच्या घाई गडबडीत अशी क्रिएटिव्हिटी बघून छान वाटतं, आणि तुम्हा सगळ्यांप्रमाणेच मला सुद्धा मला नाचताना बघून खूप मज्जा आली.”

नरेंद्र मोदी यांचा डान्स पाहिलात का? बघा Video

साहजिकच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कृष्णाच्या पेजवर अनेकांनी त्याचं कौतुक करून भावा तू जिंकलास अशा कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, “२०१९ मध्ये सुद्धा मोदींनी कृष्णाने बनवलेल्या एका मीमवर प्रतिक्रिया दिली होती आणि तेव्हाचा निवडणुकीचा निकाल आपल्याला माहितीच आहे. आता सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायची वेळ आली आहे.” तर यावर उत्तर देताना कृष्णाने गंमतीत लिहिले की, “भाऊ माझ्यावर याचा दबाव टाकू नका.”

हे ही वाचा<< Video: उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितलं मोदींसाठी मत? म्हणाले, “काँग्रेसकडे एक तरी चेहरा..”, ‘ही’ सभा कधी झाली?

विशेष म्हणजे या व्हिडीओवरून मोदींच्या खेळकरपणाची सुद्धा अनेकांनी प्रशंसा केली आहे. “मोदी खूप कूल आहेत”, “मोदींना निकालाची भीती नाही”, “मोदींनी स्वतःला हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे.” अशा कमेंट्सचा वर्षाव त्यांच्या या पोस्टवर होतोय. तसेच, कृष्णाच्या पेजवरून यापूर्वी हाच व्हिडीओ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या चेहऱ्यासह एडिट करून शेअर करण्यात आला होता पण त्यावेळेस कृष्णावर कारवाई झाली होती, असं असूनही अजून तो मिदनाचं हुकूमशाह म्हणतोय अशा कमेंट्स सुद्धा या पेजवर दिसत आहेत.