‘रात्री दहाच्या सुमारास सासवडहून कात्रजकडे जाणारी शेवटची गाडी सुटली. या गाडीत ती एकमेव महिला प्रवासी होती. पावणेबारा वाजण्याच्या सुमारास गाडी कात्रज येथे आली. या महिलबरोबर बाळ आणि सामानाच्या दोन-तीन पिशव्या होत्या. महिलेचे नातेवाईक तिला घ्यायला येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र पंधरा-वीस मिनिटे झाली तरी कोणी आले नाही. त्यामुळे गाडीतील दिवे सुरू ठेवून महिलेला गाडीत बसविले आणि आम्ही तिच्या नातेवाईकांची वाट पहात बसलो…’ पीएमपीचे कंडक्टर नागनाथ ननवरे सांगत होते.
नक्की वाचा >> “रात्री पावणे बाराला बस पूर्ण लाईट लावून उभी होती, कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, संशय आला म्हणून…”; मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत
बसमध्ये एकटी महिला आणि बाकी सगळे पुरुष होते. त्यामुळे बसचे चालक आणि वाहक पहिल्यापासूनच सावध होते. त्या महिलेला नेण्यासाठी कुणीच येईना म्हणून त्यांनी महिलेच्या नातेवाईकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भ्रमणध्वनी लागत नव्हता.
माजी नगरसेवक वसंत मोरे तेथे आल्यानंतर त्यांनी सुरक्षितपणे महिलेला त्यांच्या मोटारीतून घरी सुखरूप सोडले. मात्र प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने आम्ही महिलेसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला, असे वाहक नागनाथ ननवरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या बसचे चालक अरुण दसवडकर यांनीही हा निर्णय घेताना मोलाची साथ दिली.
ननवरे गेल्या १८ वर्षांपासून पीएमपीचे वाहक आहेत. कात्रज आगारात सध्या त्यांची नियुक्ती आहे. पीएमपी चालक-वाहकांना सलग तीन महिने एकाच मार्गावर नियुक्ती दिली जाते. त्यानुसार त्यांच्याकडे सासवड-कात्रज या मार्गाची जबाबदारी आहे.