PMPMLbus Bhosari video viral: दादा, बसमधील डावीकडील जागा ही महिलांना बसण्याकरिता आहे. असं जर एखाद्या पुरुषाला सांगितलं तरी हल्ली त्यांचा इगो फार दुखावतो. बस काय तुम्हा बायकांनी खरेदी केली का? मी पहिल्यांदा जागा पकडली आहे. काहीही झालं तरी जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका ते घेतात. हा अनुभव रोजच बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना येतो. असाच एक संतापजनक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. पीएमपीएमएल बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसलेल्या व्यक्तीला प्रवासी महिलेने उठण्यासाठी सांगितले. त्यावरून महिलेला व्यक्तीने शिवीगाळ करून मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, सर्व स्तरांतून टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसमधील आरक्षित जागेवर पुरुष बसतातच का?

ही घटना पुण्यात दिघी ते भोसरी प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अंकुश मारुती टावरे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शनिवारी सकाळी पीएमपी बसने दिघी ते भोसरी प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये अंकुश टावरे हे महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसले होते. त्यामुळे तक्रारदार महिलेने त्यांना महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून उठण्यास सांगितले. त्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपीने फिर्यादी महिलेला उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ करीत मारहाण केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भोसरी पोलीस याबाबत तपास करीत आहेत.

पीएमपीएमएल बसमध्ये महिला आरक्षणाचा वाद

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला वारंवार या पुरुषाला सीटवरून उठण्यास सांगत आहे; मात्र हा व्यक्ती उद्धटपणे थेट नकार देत आहे. त्यानंतर महिलेनेही त्याला अपशब्द वापरत त्याच्यावर हात उगारला. मग पुरुषानेही त्या महिलेला मारले आणि तिचा मोबाईल खाली पाडला. त्यानंतर दोघांमध्येही झटापट होते, आजूबाजूचे त्या दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता तुम्हीच सांगा सुसंस्कृत पुण्यातील या प्रकारात चूक कुणाची?

पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/share/v/etz9wXdsRT1baK9t/

हेही वाचा >> मुंबई लोकलमध्ये ‘दिलात झापुक झुपूक’ गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही बघितला का?

याबाबत तक्रारदार महिलेने भोसरी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, भोसरी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणी महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे तक्रार केली आहे. महिलेने दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून, आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmpmlbus bhosari video viral bhosari woman passenger assaulted fo asking person sitting in reserved seat for women to get up shocking video srk
Show comments