आजकाल सोशल मीडियावर सतत भांडणं, फसवणूक, अपघात आणि वाईट व्हिडीओ दिसतात. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींत कधीतरी एखादा व्हिडीओ असा समोर येतो, जो थेट मनाला स्पर्श करून जातो. त्यामुळे “अजूनही चांगुलपणा बाकी आहे” असं वाटायला लागतं . सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओसुद्धा तसाच आहे. स्वतःकडे फार काही नसतानाही दुसऱ्याला मदत करायला पुढे येणाऱ्या एका गरीब महिलेची ही साधी, पण खूप भावूक करणारी गोष्ट आहे.

हा व्हिडीओ एका सामाजिक प्रयोगाचा आहे. दुचाकीवरून जाणारा एक तरुण रस्त्यावर चालणाऱ्या गरीब महिलेला थांबवतो आणि फतेहपूरकडे जाण्याचा रस्ता विचारतो. ती महिला अगदी साधेपणाने आणि प्रेमाने त्याला बरोबर दिशा सांगते. थोड्या वेळानं तो तरुण लाजत लाजत सांगतो की, रस्त्यात त्याचे ५० रुपये पडले आहेत आणि तिच्याकडे असतील का, असे तिला विचारतो.

तरुणाचं बोलणं ऐकताच ती महिला क्षणाचाही विचार न करता, त्याला पैसे द्यायला तयार होते. चेहऱ्यावर कुठलीही शंका नाही, कुठलीही तक्रार नाही. ती जसे पैसे काढायला लागते, तसाच तो तरुण तिला थांबवतो आणि हसत म्हणतो,“नको काकू… तुम्ही आमचं मन जिंकलंत.”हे ऐकून ती महिला जे बोलते, ते ऐकून अनेकांचे डोळे पाणावतील.

पाहा व्हिडीओ

ती म्हणते,”बेटा, आमची परिस्थिती जरी वाईट असली तरी मदत करणं सोडायचं नसतं. माझा नवरा नाही आहे, चार लहान मुलं आहेत. पण मनात विश्वास आहे की, आपण एखाद्याला एक रुपया दिला, तर देव आपल्याला १० रुपये देतो.”हे शब्द ऐकल्यावर तरुण भावूक होतो आणि त्या महिलेला १०० रुपये देतो. दोघांच्या डोळ्यांत आदर, आपुलकी आणि समाधान स्पष्ट दिसतं.

हा व्हिडीओ ट्विटरवर @SURAJ_624 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या एक मिनिट ११ सेकंदांचा व्हिडीओआतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.प्रतिक्रियांमध्ये लोक “खरी श्रीमंती ही मनाची असते”, “ काकूंना सलाम”, “आजही माणुसकी जिवंत आहे” अशा भावना व्यक्त करीत आहेत. काही जण म्हणतायत, “हा व्हिडीओ बघून डोळ्यांत पाणी आलं”, तर काहींनी अशा महिलेला सरकारनं मदत करावी, अशी मागणीही केली आहे