आजचा दिवस विज्ञाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज नासाने असे काही करून दाखवले आहे, ज्यामुळे पृथ्वीचे भविष्यातील धोक्यांपासून रक्षण होण्यास मदत मिळू शकते. नासाने प्रथमच प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट म्हणजेच डार्ट मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यानंतर पृथ्वीवर एखाद्या लघुग्रहांचा हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली, तर या तंत्राच्या मदतीने पृथ्वीचा बचाव करणे शक्य होणार आहे. कारण भविष्यात या लघुग्रहांपासून पृथ्वीला सर्वाधिक धोका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज म्हणजेच २७ सप्टेंबरला सकाळी सुमारे ४ वाजून ४५ मिनिटांवर सुमारास डार्ट मिशनची टक्कर डिडीमॉस या लघुग्रहाच्या चंद्रासारखा दगड डिमॉर्फोसशी झाली. अशाप्रकारे हे मिशन पूर्ण झाले. हे अंतराळयान लघुग्रहावर आदळले आणि या लघुग्रहाची दिशा बदलली. मात्र ते कोणत्या दिशेने वळले आहे, हे डेटा आल्यानंतरच समजू शकते. जर डिमॉर्फोसने आपली कक्षा आणि दिशा बदलली तर भविष्यात पृथ्वीला अवकाशातून आपल्याजवळ येणारा असा कोणताही धोका नसेल. जेव्हा डार्ट मोहिमेचे अंतराळयान डिमॉर्फोसला धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी २२,५३० किलोमीटर होता.

Viral Video: बाईकवर स्टाईलमध्ये करत होता स्टंट, पोलिसांनी अशी अद्दल घडवली की चारचौघात…

डार्ट मिशनने डिडीमॉस आणि डायमॉर्फोस या लघुग्रहांची रचना, खडक, माती आणि टक्करपूर्वी त्यांचे वातावरण यांचाही अभ्यास केला. या मोहिमेदरम्यान कायनेटिक इम्पॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. डिडिमॉसचा व्यास २६०० फूट आहे. डायमॉर्फोस त्याच्याभोवती फिरतो. याचा व्यास ५२५ फूट आहे. आता टक्कर झाल्यानंतर दोन्ही दगडांच्या दिशा आणि वेगातील बदलांचा अभ्यास केला जाणार आहे.

या अभ्यासादरम्यान नासाने पृथ्वीच्या जवळ असलेल्या आठ हजारांहून अधिक जास्त वस्तूंची नोंद केली आहे. या अशा गोष्टी आहेत ज्या भविष्यात पृथ्वीला हानी पोहोचवू शकतात. यापैकी काहींचा आकार ४६० फूट व्यासापेक्षा जास्त आहे. म्हणजे भविष्यात पृथ्वीवर एकही दगड आदळला तर अमेरिकेसारख्या देशातील राज्य उद्ध्वस्त होईल. दुसरीकडे तो समुद्रात पडला तर ते २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीपेक्षाही जास्त विध्वंस होऊ शकतो.