Prasika Account Suspended : सोशल मीडियावर प्रसिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रसाद व दीपिका वेदपाठक या दोघांचा फॅन बेस प्रचंड मोठा आहे. “नमस्कार मंडळी, या जेवायला” असं म्हणत महाराष्ट्रातील घरोघरी पोहचलेल्या प्रसिकाची सोशल मीडियावर चांगलीच क्रेज आहे. प्रसिका या जोडीने इंस्टाग्राम, युट्युब, ट्विटर व फेसबुक अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर लाखो चाहते कमावले आहेत. पण सध्या या जोडीवर संकट कोसळलं आहे. या लोकप्रिय कपलचे सगळेच चॅनल्स सस्पेंड झाले आहेत. नेमकं काय घडलं, वाचा…
प्रसादने त्याच्या @prasadvedpathakofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याने स्पष्ट सांगितलं आहे की, त्यांचे सगळे चॅनल्स सस्पेंड करण्यात आले आहेत.
व्हिडीओमध्ये प्रसाद म्हणतो, “हे खूप महत्त्वाचं आहे. प्रिय, मेटा, इन्स्टाग्राम, फेसबुक, हे एका क्रिएटरचं असहाय्य आवाहन आहे, ज्याचं अकाउंट अचानक सस्पेंड झालं आहे. ज्या अकाउंट्ससाठी मी गेली १० वर्ष कॉन्टेंट क्रिएट करत आहे ते अकाउंट्स का सस्पेंड झाले आहेत, यामगचं कारण मला अद्याप कळलेलं नाही.”
“जे अकाउंट्स सस्पेंड झाले आहेत त्या सगळ्याचे डिटेल्स माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. त्यातले ३ वेरिफाईड अकाउंट्स आहेत. सर्व अकाउंट्सने कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं आहे का? मला माहित नाही. आम्ही गेल्या १० वर्षांपासून कॉन्टेन्ट करतोय आणि आम्ही कधीच कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं नाही आहे. मग असं अचानक का झालंय मेटा.”
“मी एक कॉन्टेन्ट क्रिएटर आहे आणि नम्र विनंती करत आहे. माझे क्लायंट माझी वाट पाहत आहेत. ज्या ब्रँड्ससोबत मी काम करतो त्यांचे काम आणि कॉन्टेन्ट अपलोड करणं बाकी आहे. या सगळ्या गोष्टी थांबल्या आहेत कारण मला माझ्या अकाउंट्सचा ऍक्सेस मिळत नाहीये. कृपया माझ्या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष द्या. सर्व माहिती खाली दिली आहे.” असं म्हणत प्रसादने मेटा आणि फेसबुकला अकाउंट्स परत मिळावे अशी विनंती केली आहे.”
दरम्यान, UIC म्हणजेच युअर इंडियन कन्झ्युमर या चॅनेलपासून प्रसाद व दीपिका वेदपाठक या जोडीने सोशल मीडियावर एंट्री केली होती. ग्राहक हक्कांविषयी जागरूकता तयार करण्यासाठी सुरु केलेले हे चॅनेल आज १२ लाखाहून अधिक सबस्क्राइबर्ससह मराठी युट्युब क्षेत्राचं महत्त्वाचं अंग ठरलं आहे. राजकारणापासून ते सामाजिक प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर प्रसाद व दीपिका नेहमीच परखडपणे आपली मतं मांडत असतात.
दुसरीकडे, याच जोडीचा भावनिक पैलू दाखवणारा प्रयोग म्हणजेच ‘प्रसिका’ (प्रसाद +दीपिका) सुद्धा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. भारताच्याच नव्हे तर जगभरातील विविध प्रकारच्या जेवणाला घरगुती पद्धतीने बनवून सादर करत प्रसिकाने अनेक खवय्यांची साथ मिळवली. तसंच लंच विथ प्रसिका या चॅनलवरही त्यांनी नवनवीन कॉन्टेन्ट सादर केला.
तर या चॅनल्सबरोबरच त्यांनी काही दिवसांपूर्वी सानवी वेदपाठक हे नवं चॅनल सुरू केलं होतं. यावर ते एआय जनरेटेड व्हिडीओ पोस्ट करत होते. पण या एआय जनरेटेड व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी ठळक सांगितलंही होतं की हे एआयच्या माध्यमातून केलेले व्हिडीओ आहेत.

