ओदिसामध्ये कार्यरत असणारे सरकारी अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरुन सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आयएफएस अधिकारी असणाऱ्या नंदा यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एक काय आणि बिबट्या एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो जुना असला तरी नंदा यांनी तो आता ट्विट केल्याने पुन्हा चर्चेत आला आहे.

नंदा यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये बसलेल्या एका गायीच्या बाजूला बिबट्या उभा असल्याचे दिसत आहे. गाय फोटो काढणाऱ्याकडे बघत आहे तर बिबट्या फोटोत डावीकडे बघताना दिसत आहे. हा फोटो गुजरातमधील वदोदरा येथील अंतोली गावातील असल्याचे नंदा यांनी फोटोबरोबर दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे. हा फोटो रोहित व्यास यांनी आपल्या कॅमेरात टिपला आहे. “शिकार आणि शिकारी एकत्र… शिकार आणि शिकारी येथे एकाच फोटोत दिसत असून ते एकमेकांना गोंजारात आहेत. अनेकदा हा बिबट्या या गाईला भेटायला यायचा. गायही त्याला स्वत:च्या वासराप्रमाणे जवळ घ्यायची,” असं नंदा यांनी या फोटोची माहिती देताना लिहिलं आहे. नंदा यांनी पोस्ट केलेला हा फोटो २००२ मधील म्हणजेच १८ वर्षांपुर्वीचा आहे.

माजी खासदार असणाऱ्या परिमल नथवानी यांनीही हा फोटो ट्विटवरुन शेअर केला आहे.

काय आहे या फोटोमागील कथा?

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २००२ साली २५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार गुजरातमधील वदोदरा येथील अंतोली गावातील एका गायीला भेटण्यासाठी एक बिबट्या येत असे. या बिबट्याला पाहण्यासाठी गावातील लोकांनी स्वत:च्या झोपण्याच्या वेळेतही बदल केला होता.

अनेक दिवस रोज रात्री हा बिबट्या या गायीजवळ येऊन बसायचा. गाय सुद्धा त्याला प्रेमाने जवळ घ्यायची. आपल्या वासरावर प्रेम करावे त्याप्रमाणे ती या बिबट्याला जीभेने चाटायची. त्याने कान, गळा आणि मानेजवळ ती जिभेने चाटायची आणि त्याला जवळ घ्यायची.

बिबट्याही अगदी गायीच्या जवळ जाऊन बसायचा. गायीपासून अगदी काही अंतरावरच बकऱ्या बांधलेल्या असायच्या मात्र या बिबट्याने कधीही या बकऱ्यांवर हल्ला केला नाही. ‘जेव्हा हा बिबट्या गावामध्ये यायचा तेव्हा परिसरातील कुत्री जोरजोरात भुंकायची. हा बिबट्या आल्याची चाहूल लागल्यावर गायही सतर्क व्हायची. या बिबट्याला लोकं आपल्याला पाहण्यासाठी गोळू होऊ लागल्याचे कळताच तो पळून जायचा,’ असं या घटनेबद्दल ‘ऑनफॉरेस्ट डॉट कॉम’ने म्हटलं आहे. हा बिबट्या कधीतरी या गायीच्या सहवासात आला असल्याने तो अनेकदा तिला भेटायला येत असावा असा अंदाज काही तज्ज्ञांनी या घटनेबद्दल बोलताना व्यक्त केला होता. मात्र नंतर हा बिबट्या यायचा बंद झाला मात्र त्याच्याबद्दलचं रहस्य आजही या गावामध्ये चर्चेचा विषय आहे.