Government Office Workplace Discipline Viral Video: सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी तासन् तास रांगेत उभं राहणं अनेकांसाठी नित्याचं झालं आहे. पण, याच रांगेत थांबलेल्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून एक अधिकारी मोकळेपणाने व्हिडीओ कॉल करत बसलेला दिसला, तर…? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ नेमकं हेच चित्र समोर आणतो आणि त्यामुळेच संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं घडलं तरी काय?
व्हायरल व्हिडीओची सुरुवात एका कार्यालयीन वातावरणातून होते. एका खुर्चीवर एक व्यक्ती आरामात बसल्याचे दिसते. हातात मोबाईल, चेहऱ्यावर स्मित आणि पूर्ण लक्ष स्क्रीनवर तो व्हिडीओ कॉलमध्ये इतका गुंतलेला असतो, की आजूबाजूला काय सुरू आहे याची त्याला जणू काहीच पर्वा नसल्यासारखं वाटतं.
कॅमेरा थोडा हलताच दृश्य स्पष्ट होतं. त्याच्यापासून काही अंतरावर अनेक लोक रांगेत उभे आहेत. कुणी कागद हातात धरून, तर कुणी अधीर नजरेनं पुढे पाहत, आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत आहेत. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून ‘तो’ निवांतपणे फोनवर गप्पा मारत राहतो.
यामुळेच पेटला वाद…
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेकांनी या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोस्टसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्येही संताप स्पष्ट दिसतो “ही तर निर्लज्जतेची परिसीमा आहे. सार्वजनिक ठिकाणी लोक रांगेत उभे असताना असा निवांत व्हिडीओ कॉल? नियमांचा आणि जबाबदारीचा पूर्ण विसर पडला आहे का?”
हा जुना व्हिडीओ आहे की नवा?
दरम्यान, काही जणांनी हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा केला; पण तपासात वेगळंच चित्र समोर आलं. उपलब्ध माहितीनुसार, ही क्लिप अलीकडचीच असल्याचं सांगितलं जात आहे. कार्यालयीन टेबल, फाइल्स आणि वातावरण पाहता, तो माणूस सरकारी कर्मचारीच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
नेटकऱ्यांचा संताप अनावर
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका वापरकर्त्यानं लिहिलं, “जनतेला हे लोक गुलाम समजतात का?” तर दुसऱ्यानं सुचवलं, “कामाच्या वेळेत मोबाईल वापरताना पकडल्यास कठोर कारवाई व्हायला हवी.”
आणखी एका व्यक्तीनं उपरोधिक टिप्पणी करत म्हटलं, “म्हणूनच लोक सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात. अशी मोकळीक कुठे मिळते?”
प्रश्न अजूनही कायम…
हा व्हिडीओ खरोखरच एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधतो. सार्वजनिक सेवेत असणाऱ्यांची जबाबदारी आणि शिस्त. रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा वेळ आणि संयम याची किंमत कोण मोजणार?
या घटनेनंतर एकच प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे ही केवळ एक अपवादात्मक घटना आहे की प्रणालीतील मोठ्या निष्काळजीपणाचं उदाहरण?
उत्तर अजून स्पष्ट नाही… पण या व्हिडीओनं पाहणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला भाग पडलंय एवढं निश्चित.
