Pune Mans Post Viral : “पुणे तिथे काय उणे” ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचा अर्थ असा की, “पुण्यात कशाचीही कमतरता नाही.” ही म्हण गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या अभिमानाने वापरली जात आहे; कारण भौगोलिक स्थिती, हवामान आणि सोयीसुविधा अशा सर्वच दृष्टीने हे सुसज्ज शहर आहे. पण आता हीच म्हण पुणेकरांना टोमणा मारण्यासाठी वापरली जात आहे. ‘पुण्यासारखी वाहतूक कोंडी कुठेच पाहायला मिळणार नाही’ अशा अर्थाने ती वापरली जात आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यात वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे आणि पायाभूत सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे पुण्यात राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. याच परिस्थितीवर प्रकाश टाकणारी एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुण्यातील एका तंत्रज्ञाने शहरातील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीवर टीका केली आहे. त्याच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून, गेल्या काही वर्षांत शहरातील जीवनमान खालावले आहे, असे म्हणत अनेकांनी त्याच्या मताबाबत सहमती दर्शवली आहे.

एका ‘एक्स’ (ट्विटर) पोस्टमध्ये निनाद पै यांनी लिहिले की, “पुणे एक शहर म्हणून अपयशी ठरले आहे”. असे म्हणताना त्यांना खरोखरच दुःख होत आहे. पै यांनी सांगितले की, त्यांचा जन्म, बालपण व शिक्षण पुण्यात झाले असून तिथे त्यांचे अजूनही घर आहे.

“वाहतूक कोंडी म्हणजे निव्वळ, न संपणारा नरक आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत पै यांनी वाहतूक कोंडीवर नाराजी व्यक्त केली. शहराच्या समस्यांवर उपाययोजनांशिवाय केवळ वारंवार आश्वासने देणाऱ्या राजकारण्यांवर आणि नोकरशहांवर त्यांनी टीका केली. रहिवासी वाहतूक आणि रस्त्यांच्या परिस्थितीशी झगडत असताना, पोलीस आणि वाहतूक अधिकारी सोशल मीडियावरील पोस्टवरच लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “प्रत्यक्षात रस्ते दररोज एखाद्या युद्धभूमीसारखे दिसतात,” असे ते म्हणाले.

‘खऱ्या अर्थाने सार्वजनिक वाहतूक नाही, बेबंद वाहनचालन’

पै यांनी पुढे सांगितले की, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्प ही एक “महाभयंकर आपत्ती” आहे, ज्यामुळे ‘अर्बन हिट आयलंड’ (शहरी उष्णता बेट) परिणाम अधिकच गंभीर होत आहे. त्यांनी असाही आरोप केला की, झाडे तोडून सडण्यासाठी सोडून दिली जात आहेत, तर दुसरीकडे शहरात पुरेशा सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आहे. “खऱ्या अर्थाने सार्वजनिक वाहतूक नाहीच. कोणतीही गंभीर योजनासुद्धा आखलेली नाही. फक्त अधिक रस्ते, अधिक खोदकाम, अधिक उड्डाणपूल – या सर्वांमुळे एकच गोष्ट होते: अधिक गाड्या आणि अधिक गोंधळाला आमंत्रण मिळते,” असे त्यांनी लिहिले.

पै यांनी शहरातील वाहनचालन संस्कृतीवर (Driving culture) टीका करताना म्हटले की, “स्थानिक आणि स्थलांतरित दोघेही बेधुंदपणे वाहन चालवतात आणि रस्त्यावरील वादांना हातभार लावतात. लोक मूळचे असोत वा स्थलांतरित, काही फरक पडत नाही. प्रत्येक जण असा गाडी चालवतो जणू काही संपूर्ण रस्ता त्यांचाच आहे. निव्वळ वेडेपणा. शून्य जबाबदारी. चूक कधीच मान्य करत नाहीत, कधीच सुधारणा करत नाहीत आणि कधीही ‘सॉरी’ म्हणून पुढे जात नाहीत.”

“मी लहानपणापासूनच गाडीत पॅसेंजर सीटवर बसून या शहरातील बेधुंद ड्रायव्हिंग पाहिले आहे. ते कधीच चांगले नव्हते; पण निदान तेव्हा लोक प्रत्येक लहानशा गैरसोयीचे रूपांतर मोठ्या वादात करत नसत,” असे त्यांनी लिहिले.

त्यांनी पुढे सांगितले की, या परिस्थितीचा पुणेकरांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. ते म्हणाले, “सध्या घराबाहेर पडण्याचा विचार केला तरी खूप मानसिक ताण येतो.” तसेच पुण्यात राहणाऱ्या इतरांना त्यांनी, “तुम्हीही या ठिकाणाला पूर्णपणे कंटाळला आहात का?” असा सवाल केला.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या? (How did social media react?)

या पोस्टमुळे अनेक वापरकर्त्यांनी पुण्यातील वाहतूक, प्रदूषण आणि पायाभूत सुविधांबद्दल सारखीच चिंता व्यक्त केली.

एका वापरकर्त्याने लिहिले, “अगदी खरे आहे. पुण्याने आपले सौंदर्य गमावले आहे. दिवसेंदिवस गर्दी आणि प्रदूषण वाढत आहे. एकीकडे पायाभूत सुविधा विकसित होत आहेत, तर दुसरीकडे वाहतूक व सार्वजनिक वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.”

“खरे आहे… हे एक दुःस्वप्न बनले आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कोणालाही याची पर्वा नाही… ना नागरिकांना, ना विरोधी पक्षाला आणि सत्तेत असलेल्या कोणालाच नाही,” अशी टिप्पणी दुसऱ्याने केली.

“कोणत्याही प्राधिकरणाचे कशावरही नियंत्रण नाही. दयनीय रस्ते, शहरभर कचरा, शून्य वाहतूक व्यवस्थापन, गर्दीच्या वेळी वाहतूक सिग्नलचे नियमित बिघाड, कायदा आणि सुव्यवस्थेची ढिसाळ देखभाल आणि लाखो लोकांना वाहतुकीचे साधे भानही नाही,” असे तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

“हो, गेल्या १०-१५ वर्षांत पुणे खूप बदलले आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पुणे आता रणांगण बनले आहे. घराबाहेर पाऊल ठेवल्यानेच माझी चिंता वाढते, मला रस्त्यांवरून चालायलाही भीती वाटते; कारण तिथे व्यवस्थित पदपथ नाहीत आणि असले तरी लोक त्यावर गाड्या चालवतात,” असे दुसऱ्या एकाने म्हटले.

“दुःखी होण्याची गरज नाही- ही भारतातील सर्व शहरांची आणि गावांची कहाणी आहे. कचरा उचलणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, प्रदूषण, गटारे तुंबणे, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यांची देखभाल, पदपथांचा अभाव यांसारख्या प्रमुख समस्यांमुळे गेल्या ७-८ वर्षांत जीवनमान खालावले आहे,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.