धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट सहजतेने उपलब्ध व्हावी याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यानुसार अनेक कंपन्यांनीही ग्राहकांची ही अडचण लक्षात घेत नवनवीन ब्रॅण्ड बाजारात आणले आहेत. यामध्येच ऑफिस किंवा घरी जेवण किंवा खाद्यपदार्थ सहजतेने उपलब्ध व्हावेत यासाठी स्विगी, झोमॅटो असे ब्रॅण्ड बाजारात आले. आज या लोकप्रिय ब्रॅण्डमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी अनेक डिलिव्हरी बॉय काम करतात. मात्र पुण्यात झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या बीगल प्रजातीच्या कुत्र्यालाच पळवून नेलं आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

पुण्यातील कर्वे रोड येथे राहणाऱ्या शहा दांम्पत्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी शहा यांच्या घरातून त्यांचा पाळीव कुत्रा ‘डॉट्टू’ अचानक गायब झाल्याचं वंदना शहा यांच्या लक्षात आलं. डॉट्टू घरातून गायब झाल्यानंतर शहा दांम्पत्यांनी सगळीकडे आपल्या कुत्र्याचा शोध घेतला. मात्र त्याचा शोध काही केल्या लागला नाही. त्यानंतर त्यांनी त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. या फुटेजमध्ये डॉट्टू फॅक्ट्री कॉम्प्लेक्स परिसरात खेळत होता. या परिसरामध्ये खेळत असताना तो अचानक गायब झाला. काही तास वाट पाहिल्यानंतरही त्याचा शोध न लागल्यामुळे शहा यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.


तक्रार केल्यानंतरही शहा डॉट्टूचा शोध घेत होते. यावेळी त्यांनी घराच्या बाजूला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काही फूड डिलिव्हरी बॉयकडे डॉट्टूविषयी विचारणा केली. यावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने डॉट्टूला ओळखलं आणि आपल्याच एका सहकाऱ्याकडे डॉट्टूला पाहिल्याचं सांगितलं. डॉट्टू ज्या सहकाऱ्याकडे होता त्याचं नाव संतोष असं असून तोदेखील झोमॅटोसाठीच काम करत असल्याचं निष्पन्न झालं. डॉट्टूला संतोषने पळविल्याचं समजल्यानंतर शहा यांनी संतोषशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपणच डॉट्टूला पळविल्याचं संतोषने मान्य केलं. मात्र डॉट्टूला परत देण्यासाठी तो आढेवेढे घेऊ लागला. इतकंच नाही तर आपण त्या कुत्र्याला गावी पाठविल्याचंही त्याने सांगितलं.

दरम्यान,शहा दांपत्याने संतोषला कुत्र्याच्या बदल्यात पैसे देण्याचीही तयारी दाखवली. मात्र, त्याने यावेळीदेखील विषय टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याने फोन स्वीच ऑफ ठेवला. त्यानंतर शहा यांनी झोमॅटोकडे मदत मागितली. परंतु झोमॅटोकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. मात्र पोलिसांनीही शहा दाम्पत्याला मदतीचे आश्वासन दिले असून अद्याप या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झालेली नाही.