Pune Hotel Viral Notice: देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज वाढणारे दर, घरखर्चाचा वाढलेला ताण आणि त्यातून निर्माण होणारी चिंता या सगळ्याचा परिणाम आता वेगवेगळ्या पद्धतीने दिसू लागला आहे. मात्र, पुण्यातील एका छोट्याशा खाण्याच्या ठिकाणाने महागाईवर व्यक्त केलेली नाराजी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
ही घटना पुण्यातील कोथरूड परिसरातील एका लोकप्रिय खानावळीत घडली आहे. ‘बरवे दहीवडा’ या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण आपल्या चवीसाठी आधीच प्रसिद्ध आहे. पण, यावेळी त्यांनी ग्राहकांना दरवाढीची माहिती देण्यासाठी घेतलेली वेगळीच भूमिका सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
साधारणपणे हॉटेल किंवा खानावळीत दर वाढले की एक साधी नोटीस लावली जाते. पण, येथे लावण्यात आलेली नोटीस काहीशी वेगळीच ठरली. त्यामध्ये थेट कोणाचे नाव न घेता, अत्यंत उपरोधिक आणि टोमणेखोर भाषेत महागाईवरील कारणांचा उल्लेख करण्यात आला होता. सुरुवातीला ही नोटीस पाहून ग्राहक थोडे गोंधळले, तर काहींना ती वाचून हसूही आले. मात्र, जसजसा तिचा अर्थ उलगडत गेला, तसतशी तिची चर्चा वाढत गेली.
या नोटिशीमध्ये एका ‘ऑरेंज केस असलेल्या व्यक्ती’चा उल्लेख करण्यात आला होता. त्या व्यक्तीमुळे जागतिक पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याचा थेट परिणाम एलपीजी गॅस तसेच प्लास्टिकसारख्या वस्तूंवर झाला असे सूचकपणे सांगण्यात आले होते, त्यामुळेच हॉटेलचे खर्च वाढले असून २१ मार्चपासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
विशेष म्हणजे, ही माहिती देताना हॉटेलने ग्राहकांना थेट विनंतीही केली होती, “किंवा दरवाढ मान्य करा किंवा परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करा!” असा हलकाफुलका पण विचार करायला लावणारा संदेश यातून देण्यात आला होता.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती गॅसच्या किमतीत सुमारे ६० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. विशेषतः खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यवसायांवर त्याचा परिणाम अधिक जाणवत आहे.
ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी याला “खऱ्या अर्थाने पुणेरी स्टाईल” असे म्हटले, तर काहींनी या कल्पकतेचे कौतुक केले; तर काहींनी मात्र या संदर्भावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अशा प्रकारे जागतिक घडामोडींना जबाबदार धरणे योग्य आहे का, असा सवाल केला.
महत्त्वाचे म्हणजे, या नोटिशीमध्ये नेमका कोणाचा उल्लेख करण्यात आला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर आधारित ही बाब समोर आली असून, त्यामागील खरे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
पण एक गोष्ट मात्र निश्चित, महागाईने हैराण झालेल्या नागरिकांची भावना व्यक्त करण्याचा हा अनोखा आणि वेधक मार्ग सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
