WFH Denied IT Employee Pune Viral Reddit Post: करोना संकटानंतर आता बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली. मात्र वैद्यकीय अडचणीच्या काळातही कंपन्यांकडून दाखवल्या जाणाऱ्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय पुण्यात दिसून आला आहे. गुडघ्यावर गंभीर शस्त्रक्रिया होणार असतानाही एका सॉफ्टवेअर अभियंत्याचा ‘वर्क फ्रॉम होम’ अर्ज कंपनीच्या एचआर विभागाने फेटाळून लावला. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत कंपनीच्या या निर्णयाच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने ‘रेडिट’ (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली व्यथा मांडली. एका दुखापतीमुळे त्याच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे हालचाल करणे कठीण होणार असल्याने कार्यालयात ये-जा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्याने बरे होईपर्यंत घरातून काम करण्याची परवानगी मागितली होती.

“माझे काम संपूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाचे असल्याने घरातून काम केल्यास उत्पादकतेवर कोणताही परिणाम होणार नाही”, असा दावा संबंधित कर्मचाऱ्याने केला होता. मात्र कंपनीच्या नियमावलीत अशी तरतूद नसल्याचे कारण पुढे करत एचआर विभागाने त्याची मागणी थेट फेटाळून लावली.

इतरांना परवानगी, मग माझ्यावरच अन्याय का?

संबंधित कर्मचाऱ्याने कंपनीच्या दुटप्पी धोरणावरही आक्षेप घेतला. यापूर्वी कंपनीतील काही सहकाऱ्यांना व्यवस्थापकांच्या मंजुरीनंतर एव्हीडीच्या माध्यमातून घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. “जर खर्चाचा मुद्दा असेल, तर या प्रणालीचा परवाना खर्च स्वतः उचलण्याची तयारीही मी दर्शवली होती, तरीही माझी विनंती नाकारण्यात आली,” असे या कर्मचाऱ्याने नमूद केले.

नोटीस पिरियडमुळे अडचण वाढली

संबंधित अभियंता सध्या ‘नोटीस पिरियड’वर आहे. त्यामुळे वैद्यकीय रजा घेतल्यास कंपनी सोडण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. “मी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम मागत नसून, केवळ शस्त्रक्रियेनंतर चालता-फिरता येईपर्यंत तात्पुरती सवलत मागत आहे. जर कंपनीने नकार दिला, तर माझ्याकडे कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत?” असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

या पोस्टनंतर नेटिझन्सकडून कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही युझर्सनी उपरोधिक सल्ला देत, “थेट व्हीलचेअर किंवा ॲम्ब्युलन्समधून कार्यालयात जा आणि एचआर मॅनेजरला प्रवेशद्वारावर बोलवा, तेव्हाच त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजेल,” असे म्हटले.

तर दुसऱ्या एका युझरने वास्तव मांडताना स्पष्ट केले की, “वर्क फ्रॉम होम हा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार नसून तो कंपनीच्या अंतर्गत धोरणाचा भाग आहे. त्यामुळे कंपनीवर कायदेशीर कारवाई करणे कठीण ठरू शकते.”

काही जणांनी नोटीस पिरियड पूर्ण होईपर्यंत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा किंवा नाईलाजाने वैद्यकीय रजा घेण्याचा सल्ला दिला आहे.