ऐन उन्हाळ्यात पुण्यात पावसाळा सुरु झाला आहे. मंगळावारी अवकाळी पावसाने पुणेकरांची तारांबळ उडवली. दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळनंतर आणखी वाढला. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साठले, तर काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घडना घडल्या. पावसामुळे पुण्यात सर्वत्रच वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उड्डानपुलावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. अवकाळी पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील पुलाची ही अवस्था झाली असेल तर पावसाळ्यात काय होईल अशी चिंता रहिवाशांना वाटत आहे.
सिंहगड रस्त्यावरील नव्या पूलावर मोठी कोंडी
पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात सर्वात जास्त वाहतूक कोंडी सिंहगड रस्त्यावर होते. ही कोंडी सोडवण्यासाठी विठ्ठलवाडी राजारामपूल ते फनटाईम थिएटरपर्यंत नव्याने उड्डानपूल बांधण्यात आला. १ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ठरलेल्या काळापेक्षा ६ महिने आधी या पुलाचे काम पूर्ण झाला.२.२ किमी लांबीच्या पुलामुळे पुणेकरांचा तब्बल अर्धातास वाचेल असे अंदाज वर्तवविला जात होता पण प्रत्यक्षात अगदी उलट स्थिती असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने पाऊस पडत आहे. दरम्यान काल झालेल्या अवकाळी पावसाने नव्या उड्डाणपूलावर झालेल्या कोंडीमुळे प्रशासनाचे नियोजन फसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सोशल मीडियावर एका इमारतीवरून कोणीतरी सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे दृश्य टिपले आहे. सिंहगड रस्त्यावर आणि पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. उड्डानपुलावर बराच वेळ वाहनचालक कोंडीमध्ये अडकले होते.
व्हिडीओ येथे पाहा
व्हिडिओ इंस्टाग्रामवर pune_attractions नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओवर कमेंट करत पुणेकरांनी रोष व्यक्त केला.
एकाने कमेंट केली, “हा पूल चारपदरी असता तरी हीच अवस्था झाली असती.”
उड्डाणपूल उभारण्यासाठी कोटींमध्ये खर्च केला आहे याबाबत एकान कमेंट केली की, उड्डानपूल उभारण्यासाठी लागलेले पैसे पाण्यात गेले”
तिसऱ्याने कमेंट केली की, सिंहगड चौकात सिग्नल बंद होता, पोलिस तरी किती लक्ष देणार, ऐकलं तरी पाहिजे लोकांनी”
चौथ्याने लिहिले की, “रोजचं झालयं आता तरं”