स्वतःचं घर असणं हे अनेकांसाठी केवळ आर्थिक यश नसतं, तर आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न असतं. पुण्यातील रॅपर आणि हिप-हॉप कलाकार हरिश ठाकूर याच्यासाठीही पहिलं घर खरेदी करणं हा असाच भावनिक क्षण ठरला. हरिशने नुकताच आपल्या नव्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या घराबाबत सांगताना त्याने लिहिलं की, “मी माझ्या आई-वडिलांसाठी त्यांचं पहिलं घर खरेदी केलं.” हरीशचे बालपणापासूनचे आयुष्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले असून, आई-वडील आणि चार भावंडांबरोबर तो तब्बल २५ वर्षे एका छोट्याशा १० बाय १० फुटांच्या खोलीत राहत होता.

‘एक दिवस आई-वडिलांचं स्वप्नातील घर घेईन’

हरिशने सांगितलं की, त्याचं कुटुंब निम्न-मध्यमवर्गीय होतं. त्याचे वडील कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत करत होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचं घर खरेदी करणं शक्य झालं नाही. याच काळात लहानपणी हरिशने स्वतःशी एक वचन केलं होतं. वर्षानुवर्षांची मेहनत आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं.

“लहानपणी मी स्वतःला एक वचन दिलं होतं… एक दिवस मी माझ्या आई-वडिलांसाठी त्यांचं स्वप्नातील घर घेईन,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं.

नेमप्लेटवर आई-वडिलांची नावं पाहून भावुक

नव्या घराच्या दरवाजावर आई-वडिलांची नावं असलेली नेमप्लेट पाहताना आपल्याला अजूनही हे खरं वाटत नसल्याचं हरिशने सांगितलं. लहानपणी केलेलं वचन पूर्ण केल्याचा आनंद त्याच्या पोस्टमधून स्पष्टपणे दिसून येतो.

“मी जेव्हा जेव्हा घरात प्रवेश करतो आणि नेमप्लेटवर माझ्या आई-वडिलांची नावं पाहतो, तेव्हा अजूनही हे सगळं अविश्वसनीय वाटतं,” असं त्याने लिहिलं.

‘प्रत्येक गल्ली बॉयने हा दिवस पाहावा’

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना हरिशने लिहिलं, “मला आशा आहे की प्रत्येक ‘गल्ली बॉय’ने हा दिवस पाहावा.” त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाली असून अनेकांनी त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं अभिनंदन केलं.

एका युझरने, “तुझ्या आई-वडिलांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने त्याच्या मेहनतीचं कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दुसऱ्या युझरने लिहिलं की, स्वतःचं घर नसलेल्या कुटुंबात वाढलेल्या व्यक्तीलाच अशा क्षणाचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजू शकतं. दुसऱ्या यूजरने हा आई-वडिलांना दिलेला सर्वात सुंदर भेटवस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं.