गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. पावासाने पुण्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह गारपिठीमुळे पुणेकरांची चांगली तारांबळ उडवली आहे. अचानक आलेला पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना करसरत करत प्रवास करावा लागत आहे. अशातच पुण्यातील एका डिलिव्हरी मॅनचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

भरपावसात पाण्यात पडला डिलिव्हरी बॉय

आजच्या काळात अवघ्या काही मिनिटांमध्ये दारापर्यंत कोणतिही वस्तू पोहचवली जाते ज्यामुळे ग्राहकांची सोय तर होते पण ती सेवा देताना सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ऐरवी वाहतूक कोंडीचा सामना करत वेळेत डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरपावसात डिलिव्हरी करावी लागते तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसामुळे वाहतूक कोंडी दुप्पटीने वाढतेच पण त्याचबरोबर जागो जागी रस्त्यांवर पाणी देखील साचलेले असते. धो धो पडणारा पाऊस अन् साचलेल्या पाण्यातून वाट काढत हे कर्मचारी वेळेत डिलिव्हरी पोहचवण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात. अशाच एका पुण्यातील डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा रोजचा संघर्ष दाखवतो, ज्यात अनपेक्षित हवामान आणि धोकादायक रस्त्यांवरही ते आपली कर्तव्ये कशी पार पाडतात हे दर्शवले आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, धो धो पावसात, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कशीतरी वाट काढत एक डिलिव्हरी बॉय जात आहे. अचानक त्याची गाडी एका ठिकाणी अडकते आणि तो कर्मचारी गाडीसह साचलेल्या पाण्यात पडतो. पडल्यामुळे त्याचा डिलिव्हरी बॉक्स उघडला आणि त्याच्याकडील सामान खाली सांडले.

व्हिडीओ पाहा

भरपावसात दिसली पुणेकरांची माणुसकी

सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या तीन लोकांनी तत्परतेने मदत केली. त्यांनी त्या डिलिव्हरी मुलाला पुन्हा उभे राहण्यास मदत केली आणि विखुरलेल्या वस्तू गोळा करण्यासही साहाय्य केले. ही घटना पुण्यात घडली असल्याचे अनेकांनी सुचवले आहे.

डिलव्हरी बॉयची ही अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. व्हिडीओ २ एप्रिल २०२६चा आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “डिलिव्हरी लेट झाली तरी चालेल पण तो सुरक्षित पोहचला पाहिजे.”

पुढे लिहिले आहे की. पुणे- अवेळी आलेल्या मुसळधार पावसात गुडघाभर पाण्यातून संघर्ष करत असलेल्या एका डिलिव्हरी बॉयचा हृदयस्पर्शी व्हिडीओ आज सर्वांच्या मनात घर करून गेला. व्हिडीओला ५४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे.

नेटकरी झाले भावूक

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या, मदत करणाऱ्या लोकांचे कौतुक केले आणि अशा धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली. एकाने कमेंट करत लिहिले की, समजून घेत जा रे अशा भावांना जे स्वत: उपाशी पाहून देखील तुमच्या पोटाचा विचार करतात, थोडा उशीर झाला म्हणून त्यांना ओरडून अपमानित करू नका, उलट त्यांचे आभार माना जमलं तर काहीशी रक्कम टीप दया. त्यांचा आत्मविश्वास वाढवा.”

दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, जबाबदारीचं ओझ खांद्यावर असलं की ऊन, वारा, पाऊस यांच्याशी झगडावे लागतं, त्यांची ही अवस्था पाहून डोळे पानावले. देवा अशा माणसांना बळ दे रे. फार कष्टातून ही लोक वर येण्याचा प्रयत्न करत असतात. जे कोणी अशा वेळी ऑर्डर देत असेल त्यांनी समजून घ्यावं हीच विनंती.”

तिसऱ्याने लिहिले की, “परिस्थिती खूप वाईट असते.”

डिलिव्हरी कर्मचारी देखील माणूसच आहे. त्यामुळे त्याच्या कामाचा आदर करा आणि त्यांच्याबरोबर माणुसकीने वागा हाच व्हिडीओ शिकवतो आहे.