pune elderly couple viral video : लग्नासाठी जोडीदार निवडताना अनेकदा काही मंडळी चुका करतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात भरपूर आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. लग्नासाठी जोडीदार निवडताना केवळ आकर्षण किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता थोडं स्वभावाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. त्यातच अनेकदा घरच्यांच्या तगाद्यामुळे किंवा वय उलटून चालले आहे या भीतीपोटी अनेकजण तडजोड करतात. मात्र, नंतर एकमेकांच्या गोष्टी पट नाहीत आणि मग गोष्टी घटस्फोटापर्यंत येऊन पोहचतात. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ तुम्हाला खूप काही शिकवून जाईल.
उन्हाळ्यात उसाचा रस पिणे म्हणजे स्वर्गसुख असते. तर पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये वृद्ध जोडपं हाच उसाचा रस विकताना दिसत आहेत.. कोणतीही मशीन नाही किंवा कोणत्याही यंत्र किंवा बैलाची मदत न घेता लाकडी घाण्याच्या मदतीने उसाचा रस अगदी पारंपरिक पद्धतीने काढताना दिसतात. या वयात स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द, जोडीदाराबरोबर भर उन्हात उभं राहून व्यवसायात साथ देणं कदाचित या पिढीला कधीच समजणार नाहीत. पण, या वृद्ध जोडप्याने नकळत आज सगळ्यांना शिकवलं आहे.
“आयुष्यात जर अशी साथ लाभली, तर जीवनाचा प्रवास खूप सुंदर होतो” (Viral Video)
आजोबा पांढरी धोती, सदरा, डोक्यावर टोपी घालून रस काढण्यासाठी लाकूड गोल फिरवतात आणि दुसरीकडे आजी साडी नेसून उसाचा रस ग्राहकांपर्यंत पोचवण्यास मदत करताना दिसते आहे. दोघांनी मिळून संसार सांभाळला तर संसार बहरत जातो. न जमणाऱ्या गोष्टी देखील अगदी सहजपणे जमू लागतात. त्याचबरोबर पोटा-पाण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता किंवा नशिबाला दोष न देता दोघांनी मिळून हा छोटासा का होईना व्यवसाय करायला सुरु केला. एकदा बघाच वृद्ध जोडप्याचा हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @swast.ani.mast या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “पदरात पडलेलं आयुष्य स्विकारणारी कदाचित शेवटची पिढी” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “नाही…! त्यांनी ते फक्त स्विकारले नाही तर ते बदलायची धमक पण ठेवली”, “भाऊ आम्ही गेलतो एक नंबर उसाचा रस भेटतो आणि ते मी पण फिरवले आहे”, “नशिबाला दोष न देता इमानदारीने मेहनत करून पोठ भरणारी निर्मळ माणसांची शेवटची पिढी”, “आयुष्यात जर अशी साथ लाभली, तर जीवनाचा प्रवास खूप सुंदर होतो” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
