Man Set on Fire at In-Laws’ House: पंजाबमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्नीला समजावून पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी सासरी गेलेल्या एका तरुणासोबत काही क्षणांतच अशी भयावह घटना घडली की, ती पाहून अनेक जण हादरले आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
ही घटना पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात घडली. मृत तरुणाची ओळख लवप्रीत सिंग अशी झाली आहे. तर त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या गुरजीत कौर या महिलेलाही गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, लवप्रीत सिंग आणि त्याची पत्नी संदीप कौर यांच्यात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वाद झाला होता. त्यानंतर संदीप कौर माहेरी राहण्यासाठी गेली होती. अनेक दिवस उलटल्यानंतर पत्नीला समजावून पुन्हा घरी घेऊन जाण्याच्या उद्देशाने लवप्रीत १३ जून रोजी तिच्या माहेरी गेला होता.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं वाटत होतं. मात्र काही वेळातच वातावरण अचानक बदललं. आरोपानुसार, लवप्रीतचा मेहुणा साजन सिंग याने त्याच्यावर ज्वलनशील द्रव फेकून त्याला पेटवून दिलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
लवप्रीत आगीत होरपळत असताना त्याला वाचवण्यासाठी गुरजीत कौर धावत आली. मात्र, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तीदेखील आगीच्या विळख्यात सापडली. दोघेही गंभीर भाजल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनली आणि अखेर उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेत साजन सिंग हाही भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेचा सर्वांत धक्कादायक भाग म्हणजे संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अचानक दुसऱ्या व्यक्तीवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवत असल्याचे दिसते. त्यानंतर आग लागलेला तरुण स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने इकडे-तिकडे धावताना दिसतो.
याच वेळी त्याला मदत करण्यासाठी धावून आलेली महिलादेखील आगीच्या ज्वाळांमध्ये सापडते. काही क्षणांत आग अधिक भडकते आणि दोघेही जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या अवस्थेत धावताना दिसतात. हे दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या घटनेला अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक म्हटलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी साजन सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
