परदेशात जाण्याची अनेकांची इच्छा असते. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मेक्सिको अशा वेगवेगळ्या देशांत जाण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. कारण चांगल्या प्रकारची नोकरी, चांगली लाइफस्टाईल आणि जास्त कमाई असे वेगवेगळे कारणं त्यामागचे असतात. मात्र, या देशांचे नियम फार कडक असतात. त्यामुळे काहीजण बेकायदेशीर मार्गाने (डंकी रूट) या देशात जातात आणि अडकतात.
आता अशाच प्रकारे एक तरुण मेक्सिकोमध्ये अडकला असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका पंजाबी तरुणाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आपण मेक्सिकोमध्ये अडकल्याचा तो दावा करत आहे. तसेच हा तरुण या व्हिडीओमध्ये एका खोलीत अंथरुणावर पडलेला दिसत आहे. तसेच तो हात जोडून विनवणी करत दुसऱ्यांना बेकायदेशीर (डंकी रूट) मार्गाने मेक्सिकोला न येण्याचं आवाहन करताना दिसत आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
एका भारतीय तरुणाची मेक्सिकोमध्ये अत्यंत वाईट अवस्था झाली आहे, अशा प्रकारच्या मथळ्याखाली हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर देखील केला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुण आरोप करत आहे की, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तो करत आहे. तसेच त्याला एवढी मारहाण झाली आहे की तो व्यवस्थित चालूही शकत नाही असा दावा तो करत आहे.
#jodhe during their Gurdwara sponsored dunki route in Mexico..#Waheguru Mehr kare. pic.twitter.com/gzREowzXcz
— Jkaur (@Jkaur0304) August 12, 2026
अत्यंत अस्वस्थ आणि भयभीत झालेला हा तरुण इतरांना आपण केलेली चूक न करण्याचं वारंवार आवाहन करताना दिसत आहे. तसेच बेकायदेशीर (डंकी) मार्गाने मेक्सिकोला पोहोचल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा हा तरुण करत आहे. बेकायदेशीर मार्गांनी परदेशात सुरक्षितपणे पोहोचवण्याचं आश्वासन देणाऱ्या एजंट्सच्या जाळ्यात अडकू नका असा इशाराही हा तरुण देत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये या तरुणाने त्याचं नाव किंवा पत्ता उघड केलेला नाही. दरम्यान, हा ३३ सेकंदांचा व्हिडीओ असून सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
‘डंकी’ मार्ग म्हणजे काय?
परदेशात जाण्यासाठी अनेकदा अनेकजण ‘डंकी’ मार्गाचा म्हणजे बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात. अनेक लोक ‘डंकी’ मार्गाची निवड करतात, कारण ते कायदेशीर स्थलांतराच्या मार्गांसाठी (उदा. शिक्षण किंवा कामाचा व्हिसा) पात्र ठरत नाहीत. याचं कारण अनेकदा मर्यादित शिक्षण, भाषेतील अडथळे किंवा आर्थिक अडचणी असतात. दरम्यान,’डंकी’ मार्ग म्हणजे परदेशी देशांमध्ये विनापरवाना व बेकायदेशीररीत्या (अवैध मार्गाने) प्रवेश करण्याचा धोकादायक मार्ग होय. या प्रवासात लोक विमानाऐवजी अनेक देश बदलत, लपून-छपून, जंगल, वाळवंट आणि नद्या पार करून इच्छित स्थळी पोहोचतात.
