IPopstar Singer Radhika Bhide : “मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी…’ हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असणार कारण गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र हे गाणं कानावर पडतं आहे.”मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी…” हे गाणं सध्या सर्वत्र चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत या गाण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली छाप पाडली आहे. हे गाणं गाणारी मराठमोळी गायिका म्हणजेच राधिका भिडेने तिच्या गोड आवाजाने आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
‘आय-पॉपस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राधिकाने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हृदयात आपली स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. त्यामुळेच हे गाणे गाणारी राधिका आता महाराष्ट्राची लाडकी झाली आहे.
आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आपल्या नव्या गाण्यामुळे — ‘सुंभरान मांडलं रं’. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा साज जपत राधिकाने हे धनगर गीत आय-पॉपस्टारच्या मंचावर सादर केलं आणि प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या गाण्याची माहिती देताना राधिका सांगते की,”हे गाणे एका धनगराच्या बायकोच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे जी छोट्या गोष्टींमध्ये आनंदी आहे. तिच्याकडे जे आहे त्यातच ती खुश आहे. तिच्यासाठी निळे आकाशच घराचे छत आहे आणि आकाशातील चंद्र दिव्यासारखा वाटतो.” जितक्या सुंदर शब्दात तिने गाण्याचा सार सांगितला त्यापेक्षा कित्येक पटीने ते गायले आहे.
अफाट निळ्या छताखाली
चांदणं देवा डोईवरी..
तेजाळलं माळराण सोन्यांच… सोन्याचं…
खंडेरायाला पुजती नाची वाघ्या मुरळी…
देव पावी मल्हार…मल्हार…मल्हार
सुंबरान मांडलं रं..
सुंबरान मांडलं रं..
घोंगडी टाकून पाठीला गं
भांडार लावून माथ्याला
राया जाई मेंढरं हाकाया….गं
राया जाई मेंढरं हाकाया….गं….
राधिकाच्या आवाजातील या ओळी प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालत आहेत. आय-पॉपस्टारचे परीक्षक पवन सिंह, आदित्य रिखाडी व अर्पण चंदेल तिघांनाही हे गाणे प्रचंड आवडलं. राधिकाचे गाणे ऐकून सर्वजण थक्क झाले. पुन्हा एकदा राधिकाने प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे.
व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचे तोंडभरून कौतुकही केले आहे. व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट केली की, “स्वत:च्या भाषेचा अभिमान असावा तर असा की आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा साता समुद्रापलीकडे पोहचली पाहिजे.”
दुसऱ्याने कमेंट केली की, मनाला समाधान देणारा आवाज आहे तुझा. तुझ्या गाण्यातून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तू विसरू दिली नाहीस. अशीच गात राहा.”
तिसऱ्याने कमेंट केली, “मंत्रमुग्ध”
एकाने लिहिले की,”मराठी मुलगी पुढे गेली पाहिजे” दुसऱ्याने लिहिले की, खूप छान राधिका, तू मराठीमध्येच गाणं गा”
