Radhika Merchant Ganpati dance video viral : देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुमी असताना प्रसिद्ध उद्योगती मुकेश अंबानी यांच्या घरीही बाप्पाचे विराजमान झाले आहेत. या बाप्पाचे आशीर्वाद घेण्याकरता सर्व क्षेत्रातील मंडळी अंबानींच्या अॅन्टिलिया या निवासस्थानी जात आहेत. या भेटीचे व्हिडिओही समोर येत आहेत. दरम्यान, अंबानींची धाकटी सून राधिका अंबानी यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्या आपल्या खास शैलीत विघ्नहत्या चरणी सेवा देत आहेत.

राधिका अंबानी यांचा खास नृत्याविष्कार

राधिका अंबानी यांनी भगवान गणेशाच्या चरणी एक भावपूर्ण आणि मनमोहक नृत्य सादर करून बाप्पाला अनोखी मानवंदना दिली आहे. या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गणेश चतुर्थीच्या या अध्यात्मिक सोहळ्यात राधिका यांच्या नृत्याने भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा त्रिवेणी संगम घडवून आणला. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि नृत्यातील सहजता पाहून उपस्थितांसह नेटीझन्सही मंत्रमुग्ध झाले आहेत.

‘एएनआय’ने (ANI) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये राधिका यांची बाप्पाप्रती असलेली नितांत श्रद्धा आणि आदर स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या सादरीकरणावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. काही युजर्सनी त्यांच्या या भक्तीभावाचे आणि नृत्याचे कौतुक केले आहे, तर काही नेटीझन्सने यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या या डिजिटल उत्सवात राधिका अंबानीचा हा अंदाज सध्या चांगलाच चर्चेत आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घरी विराजमान असलेल्या बाप्पाचे दर्शन घेण्याकरता राजकारण, बॉलिवूड, उद्योगक्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे, करिना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूरसह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतलं.