रघुराम राजन यांची नियुक्ती बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदी झाल्याची ‘बातमी’ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्‍‌र्हनर रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदी नियुक्ती झाल्याची पोस्ट नुकतीच फेसबुकवर टाकण्यात आली होती. यामध्ये रघुराम राजन यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यात भारतीयांहून परदेशीनाच आपल्याकडील गोष्टींची किंमत अधिक असते अशा प्रकारचा मजकूर होता. यानंतर राजन यांचे हजारो लोकांनी ट्विटर आणि फेसबुकद्वारे अभिनंदन केले असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनीदेखील सियासत डॉट कॉम या संकेतस्थळाची बातमी ट्वीट केली आहे. या बातमीत काहीच तथ्य नसून रघुराम राजन यांनी या बातमीला केवळ अफवा असल्याचे सांगत मी माझ्या सध्याच्या कामात संतुष्ट असून अशा प्रकारच्या कोणत्याही पदासाठी आपल्याला विचारणा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रघुराम राजन शिकागो विद्यापीठाच्या बुथ स्कूल ऑफ बिझनेसमधील वित्त विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.