Bull Attack On Old Man Child Video Viral : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या पिसाळलेल्या बैलाचा असाच एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण यात एका चवताळलेल्या बैलाने भररस्त्यात फेरफटका मारत असलेल्या वृद्ध आणि चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात बैल ज्याप्रकारे वृद्धाला दुखापत करतोय ते पाहून तुमच्या काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भीषणा घटना छत्तीसगडच्या रायपूरमधून समोर आली आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला पाहताना सर्व सुरळीत वाटत होतं. पण, पुढच्याच क्षणी असं काही घडेल याची कल्पनाच कोणी केली नसेल. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यात एका रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती आपल्या एक वर्षाच्या लहान नातवाला कडेवर घेऊन फेरफटका मारत खेळवत होते. तितक्यात अचानक मागून एका चवताळलेल्या बैलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.

अचानक धावत आला बैल अन्….

व्हायरल सीसीटीव्ही व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, वृद्ध आपल्या हातात लहान नातवाला घेऊन रस्त्यावर चालत होते, याचवेळी अचानक एक चवताळलेला बैल मागून त्यांच्या दिशेने धावत आला आणि दोघांना शिंगांनी उचलून खाली पाडले. हा हल्ला इतका अचानक आणि जोरदार होता की त्या वृद्धाला सावरण्याची अजिबात संधीच मिळाली नाही. बैलाच्या धडकेत वृद्धासह त्यांच्या हातातील चिमुकलाही जोरात रस्त्यावर कोसळला. जमिनीवर आदळल्यामुळे वृद्धाला तात्काळ उठून पळणे शक्य झाले नाही, त्यामुळे बैलाने त्यांना चक्क पायाने तुडवण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे चिमुकले मूल जोरात खाली पडल्यामुळे मोठ्याने रडू लागले.

खाली पडल्यानंतरही हल्ला सुरूच

हल्ल्यानंतर बैल पुढे पळून जाईल अशी अपेक्षा होती, मात्र जमिनीवर पडल्यानंतरही तो वारंवार वृद्धाच्या अंगावर धावून जात होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी वृद्धाने जवळच असलेल्या एका लोखंडी खांबाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकताच समोरच्याच घरातील एक दोन महिला धावत आल्या आणि त्यांनी तात्काळ चिमुकल्याला उचलून घेतले. पण, या घटनेमुळे तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कुटुंबीयांनी धाव घेत वाचवला जीव

या घटनेत जखमी झालेल्या वृद्धालाही त्या महिलांनी सावरून घरात नेले. बैलाच्या हल्ल्यामुळे वृद्धाला प्रचंड दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला उठून उभं राहणंही जमत नव्हतं.

स्थानिक वृत्तानुसार, या बैलाने रायपूरमधील वेगवेगळ्या भागांत आतापर्यंत अनेक लोकांवर हल्ले केले आहेत. या बैलाच्या हल्ल्यात जवळपास १५ हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच या बैलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता आणि त्यानंतरच त्याच्या वर्तनात असा हिंसक बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे.