लग्नाच्या ५४ वर्षानंतर जोडप्याला मिळाली गोड बातमी; विज्ञानाचा चमत्कार ठरला यशस्वी

राजस्थान मधील अलवर येथे राहणाऱ्या सत्तरीतील माजी सैनिक जोडप्याच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे.

लग्नाच्या ५४ वर्षानंतर जोडप्याला मिळाली गोड बातमी; विज्ञानाचा चमत्कार ठरला यशस्वी
(फोटो: प्रातिनिधिक)

कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशा अनेक गोष्टी विज्ञानाने मागील अनेक वर्षांमध्ये सत्यात उतरवल्या आहेत. असाच एक वैज्ञानिक प्रयोग राजस्थानमधील एका वृद्ध जोडप्याला आयुष्यभराचे सुख देऊन गेला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने राजस्थान मधील अलवर येथे राहणाऱ्या सत्तरीतील माजी सैनिक जोडप्याच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे. लग्नाला ५४ वर्षे होऊनही त्यांच्या घरी पाळणा हलत नव्हता. अनेक व्रत वैकल्य, उपचार करूनही त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हते अशा वेळी दीड वर्षांपूर्वी त्यांनी फर्टिलिटी क्लिनिकच्या बाबत माहिती मिळाली होती.

प्राप्त माहितीनुसार, झुंझूनुतील सिंघाना गावातील 75 वर्षांचे माजी सैनिक गोपीचंद आणि त्यांची 70 वर्षांची पत्नी पत्नी चंद्रावती असे या दांपत्याचे नाव आहे. गोपीचंद यांनी बांग्लादेश विरुद्ध युद्ध भारतीय सैन्यात मोठे योगदान दिले होते, त्यांच्या पायाला गोळी सुद्धा लागली होती. आई वडिलांचे एकुलते एक असल्याने त्यांना आपले कुटुंब पुढे न्यावे यासाठी एक बाळ व्हावे अशी इच्छा होती. लग्नानंतर 54 वर्षे ते बाळासाठी प्रयत्न करत होते. अखेरीस दीड वर्षांपूर्वी या दांपत्याने इंडो आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर या फर्टिलिटी क्लिनिकशी संपर्क केला. आयव्हीएफच्या मदतीने चंद्रावती या गर्भवती झाल्या.

वय पाहता पुढे प्रसूतीसाठी समस्या येतील असा अंदाज होताच. गर्भारपणात ९ महिने हे बाळ पोटात सुदृढ राहू शकेल का यावरही डॉक्टरांना संशय होता मात्र चंद्रावती व त्यांचे पती गोपीचंद यांनी सर्व काळजी घेतल्याने सर्व काही सुरळीत झाले व सोमवारी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.

आई कुठे काय करते? एकत्र स्पर्धा परीक्षा दिलेल्या मायलेकाच्या जोडीने मिळवलं मोठं यश; मुलाला 92वा रँक तर आई..

दरम्यान, जून २०२२ मध्येच आयव्हीएफबाबत केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे ज्यानुसार, ५० पेक्षा जास्त वयाच्या पुरुष आणि महिला यांना आयव्हीएफने गर्भधारणा करण्यास परवानगी नाकारलेली आहे. वय अधिक असल्याने या पालकांच्या पश्चात बाळाचे संगोपन कसे होणार या प्रश्नामुळे सरकारतर्फे हा मोठा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या नियमाच्या अंमलबजावणी आधीच चंद्रावती या गरोदर असल्याने त्यांना हा आनंद घेणे शक्य झाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
स्कुटीच्या आतमध्ये कसा शिरला ‘हा’ विषारी साप? Rescue Operation चा Video Viral
फोटो गॅलरी