राजस्थानमधील उदयपूर येथील एका खासगी शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे गेलीय. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री टी २० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यानंतर या शिक्षिकेने व्हॉट्सअपवर पाकिस्तानच्या विजयाबद्दल एक स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळेच तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय.

कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव नफीसा अटारी असं आहे. नफीसा या उदयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पाकिस्तानकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर नफीसा यांनी स्टेटसवर टीव्हीवर सामना पाहतानाच फोटो ठेवला होता. या फोटोला त्यांनी ‘जीत गये… वी वोन’ अशी कॅप्शन दिली होती. या फोटोमध्ये रिझवान आणि बाबर आझमचा फोटो दिसत आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी शाळेने त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. नीरजा मोदी स्कूलच्या शिक्षिका नफीसा अटारी यांना सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार नीरजा मोदी स्कूलमधून तात्काळ स्वरुपाने नोकरीवरुन काढून टाकण्यात येत आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे. या पत्रावर चेअरमनची स्वाक्षरी आहे.

नफीसा यांनी ठेवलेल्या या स्टेटसवर एका विद्यार्थ्याच्या पालकांनी रिप्लाय करुन तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देताय का असं विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं. त्यानंतर नफीसा यांनी ठेवलेल्या स्टेटसचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला आणि ही शाळा चालवणाऱ्या ट्रस्टच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत नफीसा यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.