आईसक्रिम जवळपास सर्वांचा आवडता पदार्थ आहे. थंड, गोड आणि विविध प्लेव्हर्सचे आईसक्रिम खाण्याची मज्जा काही वेगळीच असते,विशेषत: उन्हाळ्यात. पण बाजारात मिळणारे आईसक्रिम किंवा फ्रोझन डेझर्ट म्हणून विकले जाणारे पदार्थ खरंच आरोग्यासाठी लाभदायी आहे का? किंवा त्यात भेसळ तर होत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा परिस्थितीमध्ये राजस्थानमध्ये एका महिलेने ‘फ्रोजन डेसर्ट’च्या डब्यात तळाशी तेल साचल्याचा दावा करत सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर संबंधित उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, कंपनीकडून याची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला ‘फ्रूट अ‍ॅण्ड नट’ फ्लेव्हरच्या फ्रोजन डेसर्टचा डबा दाखवत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, डब्यातील वरचा थर खाल्यानंतर चव थोडी विचित्र आणि तेलकट वाटली. जेव्हा डब्याच्या तळाशी पाहिले तर डब्यात मोठ्या प्रमाणात तेल साचलेले दिसल्याचा दावा तिने केला आहे. या अनुभवामुळे ती निराश झाल्याचेही तिने व्हिडिओत नमूद केले आहे.

महिलेने व्हिडिओत सांगितले की, “हे उत्पादन वितळतही नव्हते आणि चवही विचित्र होती. आता मी हे आईस्क्रीम पुन्हा कधीच खाणार नाही, असे मी पतीला सांगितले आहे. हे माझे आवडते आईस्क्रीम होते; मात्र आता मला खूप निराशा वाटत आहे.” संबंधित डब्यावर मुदतअखेर (एक्सपायरी डेट) १५ जून २०२६ अशी असल्याचेही दिसून येते.

‘फ्रोजन डेसर्ट’ आणि ‘आईस्क्रीम’मधील फरकावर सोशल मीडियात चर्चा (Debate On Difference Between Frozen Dessert And Ice Cream On Social Media)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘फ्रोजन डेसर्ट’ आणि ‘आईस्क्रीम’मधील फरक अधोरेखित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘फ्रोजन डेसर्ट’मध्ये दुधातील साय (मिल्क फॅट) ऐवजी पाम तेलाचा वापर केला जातो, त्यामुळे त्याची रचना आणि चव पारंपरिक आईस्क्रीमपेक्षा वेगळी असू शकते.

यामुळे काही वापरकर्त्यांनी हे उत्पादन ‘आईस्क्रीम’ नसून ‘फ्रोजन डेसर्ट’ असल्याचे स्पष्ट करत, घटकांमुळे अशा प्रकारची रचना दिसण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले.

कंपनीकडून चौकशीची घोषणा; ‘कोल्ड चेन’मध्ये बिघाडाची शक्यता (Company Initiates Investigation; Cold Chain Disruption Suspected)

NDTVच्या वृत्तानुसार,”या प्रकरणाची दखल घेत कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्यांनी, “राजस्थानमधील एका उत्पादन पॅकबाबत गुणवत्ता संदर्भातील तक्रार आमच्या निदर्शनास आली असून, आम्ही तातडीने सखोल चौकशी सुरू केली आहे.”

कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणात ‘फ्रोजन डेसर्ट’सारख्या उत्पादनांसाठी सातत्यपूर्ण ‘कोल्ड चेन’ अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्पादन कारखान्यातून दुकानापर्यंत आणि तेथून ग्राहकांच्या घरातील फ्रीजरपर्यंत योग्य तापमान राखले गेले नाही, तर उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असेही कंपनीने स्पष्ट केले.

विशेषतः उन्हाळ्याच्या काळात तापमानातील चढ-उतारामुळे उत्पादनाच्या रचनेत बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्याची तपासणी केली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ग्राहक सुरक्षेला प्राधान्य देण्याचा कंपनीचा दावा (Company Reiterates Commitment To Consumer Safety)

कंपनीने दिलेल्या निवेदनात ग्राहक हेच केंद्रस्थानी असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच ‘फ्रोजन सप्लाय चेन’ अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर झालेली चर्चा यामुळे ‘फ्रोजन डेसर्ट’च्या गुणवत्तेबाबत तसेच साठवणुकीच्या पद्धतींबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या चौकशी अहवालानंतर या प्रकरणातील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.