Giant Python Rescue Shocking Video : कल्पना करा, तुम्ही शेतात काम करतायत आणि तुमच्यासमोर अचानक एक प्रचंड मोठा अजगर आला, पहिल्यांदा तर कोणीही घाबरून जाईल. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लगेच पळून जाण्याचा प्रयत्न करतील. पण, एका गावात काही महिलांनी अजगराला पाहताच जे काही केलं ते पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. या थरारक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओमध्ये राजस्थानमधील काही महिला एका मोठ्या अजगराला शेतातून ओढताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कापणीच्या वेळी हा अजगर शेतात दिसला होता. त्याचा आकार इतका मोठा होता की कोणालाही भीती वाटली असती. मात्र, घाबरून मागे हटण्याऐवजी त्या महिलांनी त्याला लोकांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून शेतात काम करणाऱ्या कोणालाही त्याचा त्रास होऊ नये.
व्हिडीओमध्ये पाहू शकता, त्या महिला अजगराला दोरीने बांधतात. त्यानंतर त्या त्याला शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अजगराचे वजन आणि लांबी इतकी मोठी असते की, त्या महिलांना त्याला ओढणे कठीण जात होते. असे असूनही त्या दोन महिला आपल्या पूर्ण ताकदीने त्याला पुढे ओढत राहतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नाही, अजगर सुटकेचा प्रयत्न करत राहतो पण तरीही त्या ओढत त्याला शेतातून दूर नेत राहतात. त्याचा छळ करण्याचा त्यांचा हेतू नाही, तर शेतातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणत्याही संभाव्य धोक्यापासून वाचवणे हा त्यांचा उद्देश आहे.
अजगराला दोरीने बांधून काढले बाहेर
अजगराचा हा भयावह व्हिडीओ dharmbai_dholpur नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, पिकांची कापणी होत असताना हा मोठा आणि जाड अजगर आढळला. या व्हिडीओमध्ये असेही म्हटले आहे की, व्याघ्र अभयारण्य स्थापन होण्यापूर्वीही या भागात असे अजगर दिसणे सामान्य होते.
अनेकदा जेव्हा लोकांना साप किंवा अजगर दिसतो, तेव्हा ते वनविभाग किंवा तज्ज्ञांच्या येण्याची वाट पाहतात. येथेही वनविभागाच्या पथकाने नंतर अजगराची सुटका केली. मात्र, त्याला त्या जागेवरून हाकलून लावण्यासाठी महिलांनी दाखवलेले धैर्य व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
