लक्झरी फॅशन जगतात प्रेरणा (Inspiration) आणि मूळ परंपरेला श्रेय न देता केलेला वापर यामधील सीमारेषा अनेकदा धूसर झालेली दिसते. गेल्या काही वर्षांत प्राडा (Prada) आणि राल्फ लॉरेन(Ralph Lauren) सारख्या मोठ्या ब्रँड्सना भारतीय डिझाइन वापरल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले आहे. विशेषतः कोल्हापुरी चप्पलांसारखीपारंपरिक पादत्राणे आणि झुमक्यांसारखे दागिने यांसारख्या भारतीय सांस्कृतिक घटकांचा वापर करूनही त्यांच्या मूळ भारतीय परंपरेचा योग्य उल्लेख न केल्याने वाद निर्माण झाले.
भारतीय हस्तकला आणि पारंपरिक डिझाइन्स हे केवळ सौंदर्याचा भाग नसून, त्यामागे शेकडो वर्षांची परंपरा, स्थानिक कारागिरांचे कौशल्य आणि सांस्कृतिक ओळख दडलेली असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी अशा डिझाइन्सचा वापर करताना मूळ स्रोताचा सन्मान, योग्य श्रेय (credit) आणि स्थानिक कारागिरांना आर्थिक लाभ देणे अपेक्षित मानले जाते. अशा घटनांमुळे जागतिक स्तरावर इतर संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि कलांचा आदर ठेवून वागणे, तसेच त्या संस्कृतीचे महत्त्व आणि भावना समजून घेणे आणि एखाद्या विशिष्ट संस्कृतीतील परंपरा, कला, पोशाख किंवा डिझाइन यांचा वापर करताना त्या संस्कृतीचा उगम, इतिहास किंवा योगदान यांना योग्य श्रेय न देणे याविषयीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, प्रेरणा घेणे चुकीचे नाही; परंतु मूळ संस्कृतीचा सन्मान राखणे आणि तिच्या योगदानाची कबुली देणे हे अत्यंत आवश्यक आहे.
राल्फ लॉरेनच्या बांधणी प्रिंट असलेल्या कापडी स्कर्टवरून वाद
राल्फ लॉरेन च्या अधिकृत वेबसाइटवर संबंधित उत्पादन “प्रिंट कॉटन रॅप स्कर्ट” या नावाने पोलो राल्फ लॉरेन अंतर्गत दिसत आहे. या स्कर्टची किंमत ₹४४,८०० ठेवण्यात आली असून तो “ टाय-डाय मल्टी” या रंगसंगतीत उपलब्ध आहे.
उत्पादनाच्या वर्णनात या स्कर्टच्या आकर्षकतेवर भर देण्यात आला आहे. त्यात नमूद केले आहे की, हा स्कर्ट “सुंदररीत्या ड्रेप केलेला” आहे आणि त्यात पारंपरिक बांधणी (Bandhini) टाय-डाय तंत्र आणि नक्षींपासून प्रेरित तेजस्वी डिझाइन वापरण्यात आले आहे.
बांधनी टाय-डाय टेक्निक म्हणजे कापडावर छोटे-छोटे भाग दोऱ्याने घट्ट बांधून, नंतर रंगात बुडवून तयार केली जाणारी पारंपरिक रंगकामाची पद्धत होय.
मात्र, या वर्णनात “बांधनी टाय-डाय टेक्निक” असा उल्लेख केला आहे. पण भारताचा आणि या कलेचा उगम, किंवा या कलेशी संबंधित कारागीर समुदाय यांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही.
याच सूक्ष्म (subtle) उल्लेखाच्या अभावामुळे हा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील अनेक नेटिझन्स असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, डिझाइन पूर्णपणे एका विशिष्ट सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले असताना, केवळ अस्पष्ट (vague) प्रेरणेचा उल्लेख करणे पुरेसे आहे का.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स
या प्रकरणावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी संबंधित स्कर्टमध्ये खऱ्या बांधणी (Bandhani) तंत्राचा वापर नसून केवळ प्रिंटद्वारे त्याचा लूक तयार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही पारंपरिक कला फास्ट फॅशनमध्ये रूपांतरित केली जात असून, मूळ कारागिरांना त्याचा कोणताही फायदा मिळत नाही, अशी टीका करण्यात येत आहे.
काही वापरकर्त्यांनी संतापाने आणि थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. एका वापरकर्त्याने, “ही प्रिंटेड बांधणी आहे, खरी बांधणी नाही… ते खऱ्या कारागिरांना पैसे न देताच याला फास्ट फॅशन बनवत आहेत. @RalphLauren हे कृत्य केविलवाणे आहे,” असे लिहून आपली नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने, “लाज नाही का वाटत?” असे विचारून, भारतीय कलेचा वापर करताना योग्य श्रेय न दिल्याबद्दल राल्फ लॉरेनवर टीका केली. आणखी एका कमेंट करत लिहिले की, “भारताच्या कला आणि डिझाइनला योग्य श्रेय देण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे म्हणत भारतीय कला आणि डिझाइनला योग्य मान्यता देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय डिजिटल क्रिएटर राधा पटेल यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत उत्पादनाच्या वर्णनात भारतीय उगमाचा स्पष्ट उल्लेख नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांनी का, राल्फ लॉरेन, का?(Why, Ralph Lauren, why?) असा सवाल करत, या स्कर्टमध्ये अस्सल बांधणी कापड वापरलेले दिसत नसल्याचे नमूद केले आणि अशा डिझाइन्समध्ये मूळ परंपरेचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
एकूणच, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत भारतीय पारंपरिक कलेला योग्य श्रेय देण्याची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे.
बांधणी ही केवळ ‘ टाय-डाय टेक्निक’ नाही , त्यामागे दडलेला आहे समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक अर्थ
बांधणी, ज्याला बंधेज असेही म्हटले जाते, ही भारतातील सर्वात प्राचीन वस्त्रकलांपैकी एक मानली जाते. या कलेचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचाअसून, ती पिढ्यान्पिढ्या जपली गेली आहे.
या कलेत कापड रंगवण्यापूर्वी हजारो सूक्ष्म गाठी (knots) अतिशय बारकाईने बांधल्या जातात. त्यानंतर कापड रंगात बुडवले जाते, ज्यामुळे कापडावर लहान ठिपक्यांचे (dotted) आकर्षक नमुने तयार होतात. ही प्रक्रिया खूप वेळखाऊ असून, त्यासाठी अचूकता, संयम आणि पिढ्यान्पिढ्यांनी मिळवलेले कौशल्य आवश्यक असते.
फक्त सौंदर्यापुरतीच नव्हे, तर बांधणीला सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व देखील आहे. भारतात ही वस्त्रे विशेषतः लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि शुभ प्रसंगी परिधान केली जातात.
म्हणूनच, बांधणीला केवळ एक सामान्य डायिंग पद्धत’ म्हणून संबोधणे म्हणजे तिच्या सांस्कृतिक वारशाचे (heritage value)आणि ही परंपरा जपणाऱ्या कारागीर समुदायांच्या योगदानाचे महत्त्व कमी लेखण्याचा धोका निर्माण होतो.
भारतामध्ये खऱ्या अस्सल बांधणी कुठे तयार होते?
भारतामध्ये बांधणी कलेचे खरे आणि पारंपरिक स्वरूप अनेक ठिकाणी पाहायला मिळते. गुजरातमधील जामनगर आणि भूजयेथे कारागीर त्यांच्या अतिशय बारकाईच्या कामासाठी आणि पारंपरिक नक्षींसाठी प्रसिद्ध आहेत.
तसेच जयपूर आणि जोधपूर ( राजस्थान) या शहरांमध्ये विशिष्ट रंगसंगती (कलर पॅलेट्स) आणि वेगळ्या नक्षींच्या शैली बांधणीi कलेत दिसून येतात.
स्थानिक बाजारपेठांपासून ते निवडक हँडलूम स्टोअर्सपर्यंत, साड्या, दुपट्टे आणि स्कर्ट यांसारखी अस्सल बांधणी वस्त्रे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. या वस्तूंची खरेदी केल्याने कारागीर समुदायांना थेट आर्थिक मदत मिळते.
बांधणी स्कर्टवरील वाद (जो राल्फ लॉरेन या अमेरिकन फॅशन हाऊसबाबत समोर आला) हा केवळ एका उत्पादनापुरता मर्यादित नाही. हा वाद ग्राहकांच्या वाढत्या जागरूकतेतील बदल दर्शवतो. आता ग्राहक फक्त डिझाइनकडे पाहत नाहीत, तर त्या डिझाइनचा उगम आणि नैतिक पद्धती यांनाही महत्त्व देत आहेत.
आजच्या काळात, जागतिक ब्रँड्स जेव्हा पारंपरिक कलेतून प्रेरणा घेतात, तेव्हा केवळ सौंदर्याची प्रशंसा पुरेशी मानली जात नाही. त्यासोबत योग्य मान्यता, पारदर्शकता आणि न्याय्य प्रतिनिधित्व अपेक्षित असते. सहकार्य, योग्य कथा सांगणे किंवा स्पष्ट श्रेय यांसारख्या माध्यमांतून, फॅशन उद्योगाला सांस्कृतिक वारशाशी अधिक जबाबदारीने जोडले जाण्याची दिशा दिली जात आहे.
