शहरांची, गावांची नावं हा केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये चर्चेचा विषय असतो. अनेकदा स्थानिक सरकारकडून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून नामांतरण करुन शहरांची अथवा गावांची नावं बदलली जातात. मात्र झारखंडमध्ये एका गावातील लोकांनीच गावाच्या नावावरुन असणारं पोलीस स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे या गावकऱ्यांनी केलेली मागणीही फार विचित्र कारणासाठी आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या रांचीपासून जवळच असणाऱ्या या गावाचं नावं आहे ‘चुटिया.’

आजूबाजूच्या गावांमधील लोकांकडून सातत्याने गावाच्या नावाबद्दलचे नको ते विनोद ऐकून कंटाळलेल्या या गावातील लोकांनी स्थानिक पोलीस स्थानकाचं नावं गावाच्या नावावरुन म्हणजेच चुटिया पोलीस स्थानक असं न ठेवता ते बदलण्याची मागणी केली आहे. आता गावकऱ्यांची ही मागणी प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या मागणीची ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु आहे.

पोलीस स्थानकाचं नाव बदलण्यात यावं यासंदर्भातील बातमीच्या कात्रणाचा फोटो एका व्यक्तीने ट्विटरवरुन पोस्ट केला. ‘दरम्यान इतर महत्वाच्या बातम्यांमध्ये…’ अशा कॅप्शनसहीत त्याने हा फोटो शेअर केला आहे. त्यावरुनच सोशल मीडियावर या गावाच्या नावावरुन आणि गावकऱ्यांनी केलेल्या मागणीवरुन दोन गट पडल्याचं दिसत आहे.

काहींनी या गावाचं नाव फारच मजेदार असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी ही मागणी योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे तर काहींनी मात्र हिंदीमध्ये शिवी म्हणून वापरला जाणारा शब्द आणि या गावाचं नाव सारखं वाटत असलं तरी दोघांमध्ये फरक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

१) एसबीआयने पण तिथली शाखा बंद केली

२) नावामध्ये ट आहे हे लक्षात घ्या

३) या पोलीस स्थानकातील पोलिसांची एकाला चिंता

४) त्यांना दोष देण्यात अर्थ नाही

५) नाव बदलू नका

६) ट आणि त मध्ये फरक आहे

७) पोलिसांनी आक्षेप कसा घेतला नाही

या बातमीच्या निमित्ताने या गावातील पोलीस स्थानकाची चर्चा इंटरनेटवर सुरु असली तरी नेमका यासंदर्भात काय निर्णय होतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. मात्र बातमीमुळे ट्विपल्सला चर्चेला एक विषय मिळाला हे मात्र नक्की.