Repido viral video: ऑनलाइन कॅब सेवेमुळे प्रवास सोपा झाला आहे. ऑनलाइन कॅब आणि बाईक टॅक्सी सेवा आज सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. रॅपिडोसारख्या सेवेमुळे प्रवास जलद आणि सोपा झाला आहे; पण कधी कधी याच प्रवासात भाड्यावरून वाद निर्माण होतात. अलीकडेच रॅपिडो कॅबमधील एका प्रवासानंतर पैसे देण्यावरून मोठा गोंधळ झाला. रस्त्यावरच आरडाओरड, पोलिसांची एंट्री आणि सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ गुरुग्राममधील एका रस्त्यावरचा आहे. एका कॅबचालकानं तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. रस्त्यावर उभी असलेली एक महिला मोठ्यानं ओरडत कॅबचालकावर आरोप करीत आहे आणि पोलिसांशीही उद्धटपणे बोलत आहे. तेथे आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली आहे. कोणीतरी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करीत आहे; तर पोलीसही पुरावा म्हणून व्हिडीओ काढताना दिसतात.
व्हिडीओची सुरुवातच महिलेच्या उद्धट बोलण्यानं होते. ती कॅबचालकाला उद्देशून तू वेडा आहेस का? (Are you mad?) असं म्हणत त्याचं नाव विचारते. चालकानं तिला उकसवलं, असा आरोप ती करते. पोलिसांनाही ती सतत सांगते की, तिनं ११२ नंबरवर चार वेळा फोन केला आहे.
त्यावेळी तिथे असलेली दुसरी महिला कॅबचालकाला विचारते की, किती पैसे नाही दिले? त्यावर चालक सांगतो की, रात्री १० वाजल्यापासून ही महिला त्याच्या कॅबमधून फिरत होती आणि तब्बल दोन हजार रुपये भाडं देण्यास ती नकार देत आहे.
पाहा व्हिडीओ
पोलिस मात्र हा वाद आपापसांत मिटवण्यास सांगतात? पण ती महिला अजिबात शांत न होता, उलट ती अजून चिडते, मोठ्यानं बोलते आणि सगळ्यांसमोर चालकावर आरोप करीत राहते. हा व्हिडीओ ट्विटर वर @RajveerIND नावाच्या युजरनं शेअर केला आहे. त्यानं प्रश्न उपस्थित केला आहे, “दिवसभर कष्ट करून, कुटुंबासाठी काम करणाऱ्या चालकाला धमकावून एखादी व्यक्ती शांत झोपू कशी शकते?”
प्रतिक्रियांमध्ये लोकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी महिलेच्या वर्तनावर टीका करीत अहंकारामुळे माणूस कसा बदलतो, हे सांगितलं आहे. एका युजरनं लिहिलं की, अशा प्रकारचं वर्तन समाजासाठी घातक आहे; तर काहींनी कॅबचालकाच्या बाजूनं सहानुभूती व्यक्त केली आहे.
