Rapido driver misbehavior video: आजच्या काळात महिलांसाठी रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ऑनलाइन कॅब आणि बाईक, टॅक्सी सेवा लोकांचा विश्वास जिंकून घेत असल्यामुळे तरी काही बेजबाबदार ड्रायव्हर हा विश्वास तोडतात. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रॅपिडो कॅब ड्रायव्हरने एका तरुणीसोबत केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे लोक संताप व्यक्त करीत आहेत. त्या तरुणीने घाबरून न जाता, थेट पोलिसांत तक्रार केली.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका तरुणीच्या रात्रीच्या प्रवासाशी संबंधित आहे. ऑफिसमधून घरी येताना तिने रॅपिडो कॅब बुक केली होती. पण या प्रवासात ड्रायव्हरने तिच्याशी चुकीच वर्तन केले, शिवीगाळ केली आणि धमकीही दिली. तिला मधेच रस्त्यावर उतरवले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तरुणीने स्वतः रेकॉर्ड केला असून, नंतर तिने घरी जाऊन घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला आहे.

व्हिडीओत पहिल्यांदा तरुणी रडत रडत कॅमेऱ्यात बोलताना दिसते. ती सांगते की, रॅपिडो ड्रायव्हरने तिला मधेच रस्त्यावर उतरवले असून, तिचे हात थरथरत आहेत. “मी याची तक्रार करणारच आणि याला धडा शिकवणार,” असे ती ठामपणे सांगते. त्यावर मागून ड्रायव्हरचा उद्धट आवाज येतो “जे करायचंय ते कर.”

पाहा व्हिडीओ

त्यानंतर व्हिडीओत तरुणी शांतपणे संपूर्ण घटना सांगते. ती म्हणते की, ड्रायव्हर मोठ्या आवाजात गाणी लावत होता आणि ती फोनवर बोलत होती. तिने दोन-तीन वेळा गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्यावर ड्रायव्हर चिडला. त्यानं अतिशय घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली आणि “माझ्या गाडीतून उतर”, असे म्हणत तिला धमकावले.

तरुणीने सांगितले की, थंडी होती आणि रस्ता सुनसान होता. तरीही ड्रायव्हरने तिला मधेच उतरायला भाग पाडले. इतकंच नाही, तर तो अचानक गाडी चालवू लागला, ज्यामुळे ती अधिक घाबरली. कशीबशी त्यानं गाडी थांबवली आणि मग ती बाहेर पडली. सुरुवातीला ती तिथून निघून जाण्याचा विचार करत होती; पण नंतर तिनं ठरवलं “आता नाही घाबरायचं.”

या व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही तासांत लाखो व्ह्युज आणि हजारो प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. लोक तरुणीच्यि धैर्याचं कौतुक करत आहेत. अनेक तरुणींनी प्रतिक्रियांमध्ये स्वतःचे असेच अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने लिहिले, “तू खूप धाडसी आहेस. प्रत्येक तरुणीनं असं पाऊल उचलायला हवं.” दुसऱ्याने म्हटले, “माझ्यासोबतही असंच घडलं होतं; पण मी घाबरले. आता वाटतं, मीही तक्रार करायला हवी होती.”

काही लोकांनी रॅपिडोसारख्या कंपन्यांनी ड्रायव्हरची तपासणी अधिक कडक करावी, अशी मागणी केली आहे. तरुणीचा हा संदेश सध्या सगळीकडे पोहोचतो आहे “घाबरू नका. आपण घाबरलो, तर हे लोक आणखी धाडस करतात.”