सोशल मीडिया म्हटलं की अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. मग ते व्हिडीओ, फोटो, बातमी, मेसेज किंवा मग सुविचार असो. अशाच पद्धतीने सोशल मीडियावर अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींनी केलेली वक्तव्यंदेखील चर्चेचा विषय असतात. पण अनेकदा ही वक्तव्यं त्यांनी केलेलीच नसतात. असाच एक अनुभव रतन टाटांना आला आहे. आपल्या नावे व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील ते वक्तव्य आपण केलंच नसल्याचं रतन टाटा यांनी स्पष्ट केलं आहे. जाणून घेऊयात नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण.

रतन टाटांच्या नावे व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे –

आधार कार्डच्या आधारे मद्यविक्री करण्यासंबंधी रतन टाटा यांनी वक्तव्य केल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये आहे. रतन टाटा यांनी हे फेक असून आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे.

पोस्टमध्ये रतन टाटांच्या नावे लिहिण्यात आलं आहे की, “आधार कार्डच्या माध्यमातून मद्यविक्री केली पाहिजे. मद्य खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारी अन्न अनुदान थांबवलं पाहिजे. जे मद्य खरेदी करु शकतात ते नक्कीच अन्नही खरेदी करु शकतात. जेव्हा आपण त्यांनी मोफत अन्न देतो तेव्हा ते मद्य खरेदी करतात”.

रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामला पोस्ट शेअर करत हे वक्तव्य आपण केलेलं नाही असं स्पष्ट केलं आहे.

आनंद महिंद्रा यांच्या नावेही बनावट पोस्ट

फक्त रतन टाटाच नाही तर काही दिवसांपूर्वी महिंदा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही ट्वीट करत आपल्या नावे व्हायरल पोस्ट बनावट असल्याचा खुलासा केला होता. या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी शाळेमध्ये स्टॉकमार्केट ट्रेडिंग शिकवलं पाहिजे असं मत व्यक्त केल्याचा दावा केला होता.

सोशल मीडियावर रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना मोठ्या प्रमाणात फॉलो करत जात असून अनेकजण त्यांना आदर्श मानतात. त्यांनी या पोस्ट फेक असल्याचं स्पष्ट केल्याने नेटिझन्स आभार मानत आहेत.