शास्त्री गुरुजींना मराठी शिकवणारी पुण्याची ‘चौकडी’ !!

रवी शास्त्रींच्या मराठी मिम्समागचे पुणेरी चेहरे

क्षितीज विचारे, महेश भोसले, वैभव शेटे आणि विशाल बिरनाळे…शास्त्रींच्या मिम्समागचा मराठी चेहरा.

विचार करा भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री अचानक मराठीतून संघाला प्रशिक्षण द्यायला लागले तर? किंवा क्रिकेटसोडून शास्त्रींनी जगातल्या प्रत्येक विषयांवर मार्गदर्शन करायला सुरुवात केली तर? कदाचित ही गोष्ट ऐकायला किंवा वाचायला तुम्हाला थोडीशी विचित्र वाटेल. मात्र सोशल नेटवर्किंग साईट्सवर गेल्या काही दिवसांमध्ये रवी शास्त्रींची ही मराठीतली शिकवणी चांगलीच गाजताना दिसते आहे. पुण्यातल्या चार तरुणांनी एकत्र येत, ‘जेम्स बाँड विरुद्ध इन्स्पेक्टर महेश जाधव’ नावाचं फेसबूक पेज तयार केलं आहे. या पेजवर रवी शास्त्री यांचे विविध फोटो वापरुन #शास्त्री_जीवनव्यवहारशास्त्र #मी_काहीही_शिकवू_शकतो या हॅशटॅगने सध्या ट्रेंड होताना दिसतायत.

 

क्षितीज विचारे, महेश भोसले, वैभव शेटे आणि विशाल बिरनाळे या ४ तरुणांनी हे फेसबूक पेज तयार केलं आहे. हे चारही विद्यार्थी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. सध्या फिल्ममेकिंग क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे चौघांच्याही मनात या क्षेत्रासंदर्भात काहीतरी हटके करण्याचा विचार होता. याच प्रयत्नातून मुळचा चिपळूणचा असणाऱ्या क्षितीज विचारेच्या डोक्यात ही कल्पना आली. यानंतर आपल्या मित्रांच्या सोबतीने त्याने फेसबूक पेज तयार केलं. मात्र पहिल्या वर्षी त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यानंतर आम्ही वेळात वेळ काढून या पेजकडे लक्ष दिलं आणि अशा विविध मिम्स तयार करायला लागलो. आपल्या नवीन पेजबद्दल क्षितीज विचारेने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधला.

या चार जणांव्यतिरिक्त क्षितीजचे आणखी काही मित्र त्याला या कामात सध्या मदत करतायत. काही जण व्हिडीओ एडिटींग तर काही जण म्युझिक देण्याचं काम करतायत. विनोद ही आपल्या सर्वांच्या जीवनात महत्वाची गोष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी इंटरनेट सर्फिंग करत असताना आम्हाला शास्त्रींचा विराट सोबतचा फोटो मिमच्या स्वरुपात आढळला. त्यानंतर आमच्या डोक्यात ट्यूब पेटली की अशा फोटोंचे मराठीतून मिम्स तयार का होऊ शकत नाही. मग आम्ही थोडा विचार करुन खास आपल्या बोलीभाषेतले शब्द वापरुन मिम्स तयार करण्याचं ठरवलं आणि अनपेक्षितरित्या याला चांगला प्रतिसाद मिळत गेल्याचं क्षितीजने सांगितलं.

आपण करत असलेल्या कामाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं क्षितीजने सांगितलं. काही दिवसांपूर्वी जीएसटी कर देशात लागू झाला, यावेळी गावातल्या पारावर याची चर्चा कशी रंगेल…. हे सांगण्यासाठी क्षितीज आणि त्याच्या टीमने धोनीचा पत्रकार परिषदेतला एक व्हिडीओ खास गावरान भाषेत डब केला. हा व्हि़डीओ आमच्या पेजवर आल्यानंतर याला इतकी प्रसिद्धी मिळाली, की अनेक ग्रुपवर तो शेअर होऊ लागला. कित्येकदा मीच बनवलेला व्हिडीओ मला व्हॉट्सअॅपवर यायला लागला. यावेळी आपणं केलेलं काम लोकांना आवडत असल्याची पावतीच आपल्याला मिळाल्याचं क्षितीजने सांगितलं.

सध्या क्षितीज आणि महेश भोसले हे मित्र या पेजवरच्या कंटेटची जबाबदारी घेतायत, तर बाकीचे मित्र पेजच्या तांत्रिक बाबींकडे लक्ष देतायत. त्यामुळे एक टीम म्हणून करत असलेल्या कामामुळेच हे यश आपल्याला येत असल्याचं क्षितीजने सांगितलं. पुढे जाऊन या सर्वांना मराठीत वेब सिरीज काढायची आहे, यासाठी आपण स्क्रिप्टींगवर काम सुरु केल्याचंही क्षितीजने सांगितलंय. त्यामुळे गेले काही दिवस मराठीत फार मोठ्या प्रमाणात रुढ नसलेल्या मिम्सना, पुण्याच्या या अतरंगी मित्रांच्या चौकडीने एक वेगळीच ओळख मिळवून दिलीये यात काही शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ravi shastri special marathi memes goes viral on social media