‘अॅलेक्सा, रडू नकोस, पुढच्या वर्षी बाप्पा येतील परत’, ‘आय अॅम सावंत, लूकींग फॉर सावंतीण’ असे एक ना अनेक भन्नाट मराठी मीम्स तुम्ही सोशल मीडियावर वाचले असतील. ‘टेरिबल मराठी टेल्स’ (TMT) हे नाव नेटकऱ्यांसाठी आता काही नवीन नाही. मराठी माणसाला आपलेसे वाटतील असे विनोद पोस्ट करण्यासाठी हे पेज प्रसिद्ध आहे. पण हे विनोद कोण पोस्ट करतात, या पेजमागील चेहरे कोणते आहेत, ही भन्नाट कल्पना सुचली कशी असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना? खळखळून हसवणाऱ्या विनोदांपासून ते रोजच्या जीवनातील घडामोडींमध्ये येणारे साधेसुधे अनुभव मीम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांसमोर सादर करणाऱ्यांमागे चार तरुणांची कल्पनाशक्ती आहे.
प्रतिक पटेल, ऋषिकेश फडके, निलेश शिंदे आणि नचिकेत चौधरी या चौघांनी ‘टेरिबल मराठी टेल्स’ हा पेज सुरू केला. यापैकी प्रतिक व निलेश हे नोकरी करतात तर ऋषिकेश व नचिकेत हे शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रीयन मीम्स या ग्रुपकडून प्रेरणा घेत ऑगस्ट २०१८ मध्ये ‘टीएमटी’ची सुरुवात केल्याचं प्रतिक सांगतो. सुरुवातीला मराठी फाँटमध्ये पोस्ट लिहिले पण त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने इंग्रजी फाँट वापरून मराठीत पोस्ट लिहिण्याचं त्यांनी ठरवलं. यामुळे केवळ मराठी भाषिकच नाही तर इतर भाषिकसुद्धा ते पोस्ट वाचू लागले आणि ते अधिकाधिक शेअर करू लागले.
https://www.instagram.com/p/B2TEnAUHmZZ/
”आमच्या पेजवरील पोस्ट लोकांना आपलेसे वाटतात. रोजच्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी आम्ही या पोस्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येकजण त्याला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करतो,” असं प्रतिक अभिमानाने सांगतो.
नवनवीन ट्रेण्ड्सचा विचार करून एखादी पोस्ट सुचल्यास त्यावर चौघंजण विचारविनिमय करतात आणि त्याला कमीतकमी शब्दांत विनोदी पद्धतीने कसे मांडता येईल याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवनाशी निगडीत एखादी गोष्ट पाहिली किंवा वाचली की आपण लगेच त्याच्याशी संबंध जोडू लागतो आणि स्वत:ला त्या गोष्टींमध्ये पाहू लागतो. ‘टीएमटी’वरील पोस्टचे हेच खरे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच या पोस्टच्या शेअरिंगमध्ये तुफान वाढ होत चालली आहे.
https://www.instagram.com/p/B2O43gynB27/
प्रत्येक पोस्ट सर्वांना आवडेलच असं नसतं. त्यामुळे एखादी पोस्ट खटकली आणि त्यावरून ट्रोल करण्यात सुरुवात झाली की कोणता उपाय शोधतात यावर प्रतिक म्हणाला, ”काही मीम्सवरून नेटकऱ्यांची टीकासुद्धा होते. अशा वेळी आम्ही चौघंजण चर्चा करून ती पोस्ट काढून टाकतो किंवा ट्रोलिंगला प्रत्युत्तर देतो. कधीकधी कमेंट्समधूनही चांगली विनोदनिर्मिती होते.” ‘टीएमटी’ या इन्स्टाग्राम पेजला सध्या साडेपाच लाखांहून अधिक नेटकरी फॉलो करतात. वाढता प्रतिसाद पाहता पुढे या पेजसाठीच नवीनवीन कल्पना सुचवून त्या प्रत्यक्षात उतरविण्याच प्रयत्न करणार असल्याचं प्रतिकने सांगितलं.
सोशल मीडियामुळे आजवर बऱ्याच छुप्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. कल्पनाशक्ती, विनोदबुद्धीच्या जोरावर ‘टीएमटी’च्या या चार तरुणांनी सोशल मीडियावर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
स्वाती वेमूल
swati.vemul@indianexpress.com