Doraemon Real Life House: लहानपणी टीव्हीसमोर बसून डोरेमॉन आणि नोबिताच्या भन्नाट दुनियेत रमले नसतील असे लोक फारच कमी असतील. डोरेमॉनची भन्नाट गॅजेट्स, नोबिताच्या खोड्या आणि त्या शांत गल्लीबोळांमधलं सुंदर जग आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. पण जर तुम्हाला सांगितलं की, डोरेमॉनच्या त्या काल्पनिक दुनियेसारखंच एक खरंखुरं ठिकाण जपानमध्ये आहे, तर…?

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. कारण- या व्हिडीओमध्ये दिसणारं ठिकाण अगदी डोरेमॉन आणि नोबिताच्या शहरासारखंच दिसत आहे.

भारतीय कंटेंट क्रिएटर सार्थक सचदेवा यांनी भारतातून तब्बल सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून जपानमधील हे खास ठिकाण शोधून काढलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जपानमधील शांत परिसर, अरुंद रस्ते, लहान घरं आणि निवांत वातावरण पाहायला मिळतं. हे दृश्य पाहताच अनेकांना डोरेमॉनमधील नोबिताचं घर, त्याचा रस्ता आणि शाळेकडे जाणारी गल्ली आठवू लागली.

व्हिडीओमध्ये सार्थक स्वतः कॅमेऱ्यासमोर येत सांगतात, “हे ठिकाण पाहण्यासाठी मी भारतातून थेट जपानमध्ये आलो आहे.” त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसर दाखवला आणि डोरेमॉनमध्ये दिसणाऱ्या अनेक जागांशी त्याचं साम्य दाखवून दिलं.

एका रस्त्याकडे बोट दाखवत त्यांनी सांगितलं, “याच रस्त्यावरून नोबिता शाळेत जाताना आपण कित्येकदा पाहिलं आहे.” हे ऐकल्यानंतर चाहत्यांच्या भावना अक्षरशः उफाळून आल्या. कारण- व्हिडीओतील दृश्यं इतकी मिळतीजुळती होती की, अनेकांना आपण खरोखरच डोरेमॉनच्या दुनियेत फिरत आहोत, असंच वाटू लागलं.

शांत वातावरण, स्वच्छ रस्ते आणि साधी, पण सुंदर घरं पाहून अनेकांनी या जागेचं कौतुक केलं. विशेष म्हणजे या परिसरात एक वेगळीच शांतता आणि निरागसपणा दिसत होता, जो डोरेमॉनच्या प्रत्येक भागात जाणवत असे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘Real Life Doraemon Locations’ असं लिहिण्यात आलं आहे. डोरेमॉनची कथा टोकियोत घडते, असं मानलं जात असलं तरी अनेक चाहते या दृश्यांची तुलना लेखक फुजिको एफ. फुजियो यांच्या वास्तव आयुष्यातील परिसराशी करीत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल झाला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेक युजर्सनी कमेंट्स करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. एका युजरनं “अंगावर काटा आला”, असं लिहिलं. दुसऱ्यानं “हे पाहून पुन्हा बालपण आठवलं”, अशी प्रतिक्रिया दिली.

येथे पाहा व्हिडीओ

काहींनी तर हा व्हिडीओ पाहून डोरेमॉनचे जुने भाग पुन्हा पाहण्याची इच्छा झाल्याचंही सांगितलं. नोबिताच्या खोड्या, डोरेमॉनची गॅजेट्स आणि त्या निरागस दुनियेची आठवण आजही लोकांच्या मनात तितकीच जिवंत असल्याचं या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.